आई कुठे काय करते ही मालिका अनेक कारणांनी सतत चर्चेत असते. मालिकेतील अनिरुध्द देशमुख म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळी हे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. 'आई कुठे काय करते'ने मिलिंद यांना एक वेगळी ओळख दिली. मात्र आता मालिका सोडुन आपण दुसरं कोणतंही काम करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यांना गेले काही महिने एका वेबसीरिजसाठी वारंवार कॉल येत आहेत. ही मुख्य भूमिका असली तरीही आपण मालिका सोडून इतर कोणतंही काम करणार नाही आणि ऑडिशन देणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.
मिलिंद यांनी पोस्ट करत लिहिलं, 'मला नुकताच एका कास्टिंग डायरेक्टरचा मेसेज आला. गेल्या काही महिन्यांमधला हा नववा कॉल होता आणि तो सुद्धा मुख्य भूमिकेसाठी. त्याने ते पात्र इतक्या छान पद्धतीने समजावून सांगितलं की कोणताही कलाकार ते करायला तयार झाला असता. कोणत्याही कलाकाराला मुख्य भूमिकेत काम करायचं असतं. एखाद्या अभिनेत्याला ती व्यक्तिरेखा साकारून, त्याचे शंभर टक्के देऊन समाधान मिळतं. पण मी पुन्हा ऑडिशन दिली नाही कारण आता मी 'आई कुठे काय करते' शिवाय दुसरा कोणताही प्रोजेक्ट करणार नाही. जेव्हा मी माझ्या करिअरला सुरुवात केली, तेव्हा काम मिळवण्यासाठी तुमचा प्रोफाईल फोटो प्रोडक्शन हाऊसमध्ये जमा करावा लागायचा, मग दिग्दर्शक तुम्हाला कास्ट करायचा की नाही हे ठरवायचा. आता वेळ बदलली. प्रत्येक अभिनेत्याला ऑडिशन किंवा स्क्रीन टेस्ट किंवा लुक टेस्टमधून जावं लागतं. '
पुढे त्यांनी लिहिलं, 'माझ्यासाठी ऑडिशन हा मोठा अडथळा राहिला आहे. मला ऑडिशन द्यायला कधीच आवडलं नाही. मी मोठमोठे प्रोजेक्ट सोडले, जे मला करायचे होते. त्यांनी मला ऑडिशन द्यायला सांगितली म्हणून मी मागे हटलो असं नाही.मी कधीच ऑडिशन दिलेली नाही असंही नाही पण मला माहीत आहे मी यात कधीच चांगला नव्हतो. मी माझं ९९ टक्के काम ऑडिशन न देता केलं आहे. मी भाग्यवान आहे की मी वेगळ्या पिढीतील कलाकार आहे नाहीतर ऑडिशन दिल्याशिवाय मी या इंडस्ट्रीत टिकू शकलो नसतो.असं असूनही मी अनिरुद्ध देशमुख 'आई कुठे काय करते' मधील या व्यक्तिरेखेसाठी नमिताला ऑनलाइन ऑडिशनचे व्हिडिओ पाठवले आणि पुढची गोष्ट तुम्हा सगळ्यांसमोर आहे.' ही पोस्ट करत त्यांनी आपण इतर काम करणार नसल्याचं म्हटलं आहे.