ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणा-या कंपन्या झोमॅटो, स्विगी यांच्याबद्दल अनेकदा ग्राहकांकडून तक्रारीचा सूर उमटवला जातो. कधी वेळेवरच पोहचत नाही. कधी चुकीचं पार्सल डिलिव्हर केलं जातं. तर कधी जास्त पैसे आकारले जातात. पण नुकतंच मराठी कलाविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिकणारी अभिनेत्री गौतमी देशपांडेला या फूड डिलिव्हरी कंपनीचा आलेला अनुभव खुपच अचंबित करणारा आहे. कारण ह्यात फूड डिलिव्हरी करणा-याची काहीच चुक नाहीय. ह्याबाबतचा एक व्हिडीओसुध्दा तिने शेयर केलाय.
गौतमीने नुकतंच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने स्विगीवरून केलेली ऑर्डर २ अनोळखी व्यक्ती चोरून नेत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत गौतमीने या गोष्टीची खंत व्यक्त केली आहे. लोकांची वृत्ती कशी असते यावरही गौतमीने भाष्य केलं आहे.
या व्हिडिओमध्ये एका पेट्रोल पंपावर स्विगी डिलिव्हरी बॉयची गाडी उभी आहे. गाडीचा मालक दूर असल्याने २ अज्ञात लोकांनी या गाडीवरच्या बॅगेतून पार्सल उचललं आणि तिथून ते लंपास झाल्याचं दिसत आहे. या व्हिडिओमध्ये मात्र त्या दोघांचे चेहेरे कैद झाले आहेत. त्यांना रंगे हात पकडल्याचा हा व्हिडिओ गौतमीने शेअर केला आहे.
“मी आज तिरामीसु ही माझी आवडती डिश ऑर्डर केली. १ तास वाट पाहिल्यावर मी जेव्हा डिलिव्हरी बॉयला फोन केला तेव्हा मला माझं पार्सल चोरीला गेल्याचं समजलं. प्रथम माझा यावर विश्वासच बसला नाही. नंतर मला डिलिव्हरी बॉयने हा व्हिडिओ पाठवला. एखाद्याचं अन्न असं चोरून हसत घेऊन जाणं हे निर्लज्जपणाचं लक्षण आहे.” ही पोस्ट लिहून तिने स्विगी आणि मुंबई पोलिस यांनादेखील टॅग केलं आहे.