‘पुनीत बालन स्टुडिओज्’ची नवीकोरी निर्मिती, अजय-अतुल यांचं अफलातून म्युझिक, महेश लिमयेंचा जादूई कॅमेरा आणि दिग्दर्शन तर अमेय वाघ-वैदेही परशुरामी यांची सुपरक्यूट जोडी असं भन्नाट कॉम्बिनेशन असलेला 'जग्गू आणि जुलिएट' हा चित्रपट नवीन वर्षात १० फेब्रुवारीला आपल्या भेटीस येतोय.
पुनीत बालन निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटात नक्की कोणती जोडी असेल, याचा अंदाज प्रेक्षक बांधत होते, मात्र प्रेक्षकांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी यांची भन्नाट जोडी या चित्रपटात दिसत आहे. तसेच मोशन पोस्टरचे अजय-अतुल यांचे म्युझिक ऐकून तरुणाई आणि तमाम रसिक प्रेक्षक त्यावर थिरकतील.
अमेय आणि वैदेही जावा बाईकवर बसलेत, वैदेही बेधडकपणे गाडी चालवत आहे आणि अमेय मागे गाडीवर उभा आहे. अंगात रंगीबेरंगी जॅकेट, गळ्यात सोन्याची साखळी आहे ज्यावर ‘Rich’ असं लिहिलंय. तर वैदेही तिच्या लेदर जॅकेट, गॉगल आणि बिनधास्त स्माईलने सगळ्यांना घायाळ करत आहे. या जोडीचे फॅन आता पुन्हा एकदा हे दोघं काय धमाल करतात हे बघण्यासाठी सज्ज आहे. चित्रपटाचं कलरफुल मोशन पोस्टर, अमेय वाघचा नेहमीपेक्षा वेगळा असा अतरंगी लूक बघून चित्रपटात आणखी कोणकोणते कलाकार असतील हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
‘पुनीत बालन स्टुडिओज्’ने यापूर्वी निर्मिती केलेला सामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’च्या सुपरहिट यशानंतर आता ‘जग्गू आणि जुलिएट’च्या रूपात नवीकोरी रोमँटिक लव्हस्टोरी प्रदर्शित होत आहे. पुनीत बालन स्टुडिओज् निर्मित, अजय-अतुल म्युझिकल आणि महेश लिमये यांच्या दिग्दर्शनाची आणि कॅमेऱ्याची जादू दाखवणारा ‘जग्गू आणि जुलिएट’ १० फेब्रुवारी रोजी आपल्या भेटीस येत आहे.