'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या आनंद दिंघेंच्या आयुष्यावर आधारित सिनेमाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रसाद ओक अभिनीत आणि प्रविण तरडे दिग्दर्शित या सिनेमाला समिक्षकांनीसुध्दा खुप उचलून धरलं. आता रसिकांना या सिनेमाच्या सिक्वलची उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकच्या नव्या पोस्टने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिलाय. आता प्रसाद आपल्याला एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्याने ही माहिती दिली आहे.
प्रसाद ओक कायमत त्याच्या कामामुळे चर्चेत राहिला आहे. सोशल मीडियावरही तो बराच सक्रिय असतो. पत्नी मंजिरी ओकबरोबर तर तो अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करताना पाहायला मिळतो. ‘धर्मवीर’नंतर तो आता मराठीतले दिग्गज अभिनेते स्व. प्रभाकर पणशीकर यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. पोस्ट शेअर करत प्रसादने माहिती दिली आहे. ‘तोच मी प्रभाकर पणशीकर प्रसाद ओक’, अशी पोस्ट असून ‘नवं वर्ष, नवं स्वप्न सोबत जुनेच मित्र कलावंत आणि आशीर्वाद देणारे आहेत पंत,’ असा कॅप्शनदेखील दिलं आहे.
प्रसाद ओकच्या या आगामी सिनेमाची लेखन-दिग्दर्सनाची धुरा सांभाळतायत हर हर महादेव व आणि काशिनाथ घाणेकर सिनेमाचे अभिजीत देशपांडे. श्री गणेश मार्केटिंग आणि फिल्म्सने याची निर्मिती केली आहे. पणशीकर पंतांनी मराठी रंगभूमी गाजवली.
प्रसाद ओकला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याच्या या सिनेमाच्या घोषणेवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.