झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'घर बंदूक बिर्याणी' या चित्रपटाची काही महिन्यांपूर्वी घोषणा करण्यात आली होती आणि तेव्हापासूनच या चित्रपटात काय पाहायला मिळणार, याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आता प्रेक्षकांना जास्त प्रतीक्षा करावी लागणार नाही, कारण या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यात पूर्ण झाले असून आता लवकरच 'घर बंदूक बिर्याणी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित या चित्रपटात सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि नागराज पोपटराव मंजुळे यांच्या प्रमुख भूमिका असून येत्या नवीन वर्षात ‘घर बंदुक बिर्याणी’ प्रदर्शित होणार आहे. एकाच वेळी हा चित्रपट मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे.
झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे हे नेहमीच प्रेक्षकांसाठी काहीतरी भन्नाट विषय घेऊन येतात. यापूर्वी त्यांनी एकत्र येऊन फॅंड्री, सैराट, नाळ यांसारखे सुपरहिट आणि वेगळ्या धाटणीचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आणि आता ‘घर बंदुक बिर्याणी’ हा एक वेगळा विषय ते आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत.
टीझर पाहता, 'घर बंदूक बिर्याणी' या चित्रपटातही काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे. पोलीस आणि डाकूंची चकमक यात दिसत असून हा पाठलाग कशासाठी आहे आणि यातून काय निष्पन्न होणार आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
या चित्रपटाबद्दल निर्माते नागराज मंजुळे म्हणतात, " झी स्टुडिओसोबत याआधी सुद्धा मी काम केले आहे. झी स्टुडिओजसोबत काम करण्याचा अनुभव अनोखा असतो. नुकतेच आमचे ‘घर बंदुक बिर्याणी’चे चित्रीकरण संपले असून एका बाजूला काम पूर्ण झाल्याचे समाधानही आहे आणि इतके दिवस एकत्र राहिल्याने थोडा भावनिकही झालो आहे. यात मी एका पोलिसाची भूमिका साकारत आहे. सयाजी शिंदे सारख्या अष्टपैलू अभिनेत्यासोबत काम करताना मजा आली. आकाशसोबत मी याआधीही काम केले असून तो एक उत्तम कलाकार आहे. एखादी भूमिका साकारताना तो त्यात स्वतःला झोकून देतो. आता चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच आम्ही प्रदर्शनाची तारीखही जाहीर करू.’’