By  
on  

Trailer Out : सरला भिकाच्या नशिबाची गोष्ट 'सरला एक कोटी'

‘सरला एक कोटी’ चित्रपटाची सगळीकडेच जोरदार चर्चा असताना आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरने धुरळा उडवलेला असतानाच टीझरची एन्ट्री झाली होती... टीझरनंतर प्रेक्षक आतुरतेने ट्रेलर कधी येणार याची वाट बघत होते. अशातच ट्रेलरचे दणक्यात स्वागत झाले आहे आणि ट्रेलरनेही रसिक प्रेक्षकांना वेड लावले आहे. सरला अन् भिकाच्या जोडीची ही गोष्ट बघण्यासाठी आता तमाम प्रेक्षक वर्ग सज्ज आहे. ट्रेलरसोबतच या चित्रपटातील ‘एक से एक’ गाणीही रिलीज झाली आहेत!

‘सरला एक कोटी’च्या ट्रेलर आणि आणि म्युझिक लॉन्चचा हा सोहळा मुंबईत दिमाखात पार पडला. नवलवाडीतील निरागस, सौंदर्याची खाण असलेली सरला आणि तिचा भोळा-भाबडा नवरा भिका यांच्या नशिबाची गोष्ट या चित्रपटात सांगण्यात आलेली आहे. पत्ते खेळण्यात तरबेज असलेला भिका डावात हारतो आणि आपल्या सुंदर बायकोला डावावर लावतो आणि मग पुढे काय होतं याची गोष्ट चित्रपटात सांगितली आहे.

सरलाच्या भूमिकेत अभिनेत्री ईशा केसकर आणि भिकाच्या भूमिकेत ओंकार भोजने यांनी कमाल केली आहे. या दोघांसोबत असणाऱ्या तगड्या स्टारकास्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. अभिनेत्री छाया कदम यांनी सरलाची प्रेमळ सासू आणि भिकाच्या आईची भूमिका केली आहे. याशिवाय कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, वनिता खरात, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम, अभिजीत चव्हाण, यशपाल सारनात या कलाकारांमुळे चित्रपटाचा ट्रेलर आणखी खुलला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Isha Keskar (@ishagramss)

या चित्रपटातील आणखी एक खास गोष्ट म्हणजे यातील गाणी... या चित्रपटात तीन गाणी आहेत. 'केवड्याचं पान तू' या गाण्याचे गायक अजय गोगावले आणि आर्या आंबेकर हे आहेत. ‘थाऱ्यावर जीव राहिना’ या गाण्याला वैशाली माडे यांनी चार चाँद लावले आहेत. तर, ‘सई माय साजणी’ हे गाणं सायली खरे हिने गायले आहे. सर्व गाण्यांना विजय गवंडे यांनी संगीत दिलं आहे, तर गुरू ठाकूर यांच्या शब्दांनी नेहमीप्रमाणेच जादू केली आहे. म्युझिक लॉन्च सोहळ्याला अल्ट्रा समूहाचे सुशिलकुमार अगरवाल आणि बिझनेस हेड श्याम मळेकर उपस्थित होते. सानवी प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत आणि आरती चव्हाण निर्मित “सरला एक कोटी’’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘आटपाडी नाईट्स’चे नितीन सिंधुविजय सुपेकर यांचे आहे. हा चित्रपट नवीन वर्षात २० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होईल.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive