रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या सिनेमाने प्रेक्षकांना तुफान वेड लावलंय. 30 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा अजूही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य तर गाजवतोच आहे पण बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणें घेतोय. वेडचं गारुड प्रेक्षकांवर अद्याप आहे व ते बॉलिवूडच्या सिनेमांवरही भारी पडतंय.
रितेशने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत वेड विषयी मोठी घोषणा केली आहे ती म्हणजे चित्रपटातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हे गाणं खास करून सत्या आणि श्रावणीच्या लव्हस्टोरीबद्दल असणार आहे. या गाण्यात प्रेक्षकांना पुन्हा रितेश आणि जिनिलियाची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.
रितेशने पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये चित्रपटातील सत्या त्याच्या जिवलग मित्रासोबत गप्पा मारत आहे. रितेशचा मित्र त्याला 'वेड' चित्रपटाविषयी जाणीव करून देतो कि 'वेड' मध्ये सत्या आणि श्रावणीच शेवटी एकत्र आले असले तरी या दोघांचं एकही गाणं नाहीये. त्यावर रितेश देखील विचार करू लागतो आणि सत्या आणि श्रावणीच्या गाण्यासाठी तयार होतो. या व्हिडिओला रितेशने 'लवकरच येत आहे...' असा कॅप्शन दिला आहे.रितेशने केलेल्या या घोषणेमुळे हे नवं गाणं पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
वेड सिनेमात रितेश आणि जिनिलिया देशमुख यांच्या सोबतच जिया शंकर, शुभंकर तावडे, अशोक सराफ, विद्याधर जोशी आदी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.