मराठीतील अनेक आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट. प्रियाने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट, नाटक, वेबसिरीज मधून अभिनय करत मराठीसह इतर भाषांतील प्रेक्षकांचे देखील मनोरंजन केलं आहे. प्रिया बापट तिच्या सोशल मीडियावरून चाहत्यांच्या नेहमी संपर्कात असते. प्रियाने नुकतीच तिच्या आईसाठी एक भावूक पोस्ट केली आहे. प्रियाने काही वर्षांपूर्वीच आईला गमावलंय. अनेकदा सणासुदीच्या कुटुंबासोबतच्या पोस्टमध्ये ती आईला मिस करत असल्याचा नेहमी उल्लेख करते. पण आता तिच्या पोस्टमुळे नेटक-यांचेही डोळे पाणावले आहेत.
मला एक फुलपाखरू दिसलं आणि मला माहीत आहे की ते तूच आहेस. मला एक फूल दिसलं आणि त्यात मला तू दिसलीस. तुझं त्यांच्यावर किती प्रेम होतं हे मला माहीत आहे आणि म्हणूनच देवाने तुला त्यांच्यासोबत राहण्याची, बागडण्याची संधी दिली. तू गेल्यानंतर, तुझ्याशिवाय जगायला शिकणं अजिबात सोपं नव्हतं. परंतु तूच नेहमी म्हणायचीस ना की हे जीवनाचं वर्तुळ आहे, सत्य आहे आणि इथे प्रत्येकाला पुढे जावंच लागतं. तुझ्याशिवाय आमचं संपूर्ण आयुष्य अपूर्ण, निर्रथक आणि शिळं असल्यासारखं वाटतं. मग मी तुझा लढा आठवते. तू तुझ्या दुःखात आणि वेदनेतही कशी आनंदी होतीस हे आठवते, कोणत्याही परफेडीची अपेक्षा नसलेलं तुझं हसू आठवते आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीने जीवन जगायला उभी राहते. पुन्हा एकदा कठोर परिश्रम आणि मेहनत करण्यासाठी, मी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उभी राहते. तुझं प्रेम माझ्या नसानसांत वाहतंय आई.'
प्रियाने पुढे म्हटलंय, आई तू आकाशात असतेस. तु आता तारा झालीय. तु्झ्याकडे जादुई शक्ती असते मग आता मला चिंता कसली. प्रियाच्या या पोस्टवर नेटक-यांनी तिच्यासाठी सांत्वनपर प्रतिक्रिया दिल्या आहेत.