By  
on  

७३व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'घात' चा वर्ल्ड प्रीमियर

छत्रपाल निनावे दिग्दर्शित आणि शिलादित्य बोरा निर्मित, जितेंद्र जोशी, मिलिंद शिंदे, सुरुची आडारकर, धनंजय मांडवकर आणि जनार्दन कदम आदी कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत.

प्लॅटून वन फिल्म्स या फिल्म स्टुडिओसाठी नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे.  १६ ते २६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत बर्लिन येथे होणार्‍या जगातील आघाडीच्या चित्रपट महोत्सवांपैकी एक असलेल्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'घात' या मराठी चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे.

छत्रपाल निनावे यांनी दिग्दर्शकीय पदार्पणात स्वत:च लिहून दिग्दर्शित केलेला 'घात' हा चित्रपट भारतातील माओवादी प्रभावित जंगलांच्या किनाऱ्यावरील पार्श्वभूमीवर उलगडणारा स्लो-बर्न थ्रिलर आहे, जो शत्रू, नागरिक आणि पोलिस यांच्यातील तणावपूर्ण परस्परसंवादांवर आधारलेला आहे.

उत्साहित आणि भारावलेले छत्रपाल म्हणाले, "हा एक मोठा, खडतर आणि साहसी प्रवास होता, पण आता बर्लिनेल येथे आमच्या चित्रपटाचा प्रीमियर होणे हा मला खूप मोठा सन्मान वाटतो. या वाटेवर आम्हाला अनेक कलाकारांनी प्रेरणा दिली. 'घात' हा चित्रपट विश्वास, विश्वासघात आणि हल्ला यावर आधारलेला आहे. घनदाट जंगलात शिरताना त्यातील व्यक्तिरेखांच्याही मनांत खोलवर नेणारा हा थ्रिलरपट आहे. आमच्या चित्रपटावर विश्वास ठेवल्याबद्दल मी प्लॅटून वन फिल्म्स आणि दृष्यम फिल्म्सचा आभारी आहे. बर्लिन, भारत आणि त्यापलीकडील्याही प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचेल अशी मला आशा आहे."

अभिनेता जितेंद्र जोशी म्हणाला, "मध्य भारतातील जंगलातील लोकेशन्सवर शूटिंग करणे नक्कीच अवघड आणि आव्हानात्मक होते, पण या अतुलनीय बातमीमुळे केलेली मेहनत फळाला आल्याचे वाटते. चित्रपटातील सर्व कलाकार आणि क्रू यांनी खूप मेहनत घेतली असल्यामुळे टीमसाठी, मराठी सिनेमासाठी आणि संपूर्ण भारतीय सिनेमासाठी हा एक मोठा विजय आहे."

अभिनेते मिलिंद शिंदे म्हणाले, "विषयापासून ते पटकथेपर्यंत 'घात' हा एक अनोखा मराठी चित्रपट आहे. चित्रपटाची कथाच स्वत:मध्ये हिरो आहे. हा चित्रपट बर्लिनमधील सिल्व्हर स्क्रीनवर प्रदर्शित होणे ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब असून, आमच्या मेहनतीचे चीज झाले आहे."

अभिनेत्री सुरुची आडारकर म्हणाली, "घात हा अत्यंत वास्तवदर्शी चित्रपट असून, अनेक लोकांना या परिस्थितीचे आणि या प्रदेशांचे वास्तव माहित नाही. हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशी मला आशा आहे."

प्लॅटून वनचे शिलादित्य बोरा आणि दृष्यमचे मनीष मुंद्रा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे, हे दोघेही नवनवीन प्रतिभांना प्रकाशझोतात आणण्यासाठी आणि भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे नेण्यासाठी फिल्म जगतात प्रसिद्ध आहेत. मिलापसिंह जडेजा आणि संयुक्ता गुप्तांसोबत मिलिंद शिंदे (हर हर महादेव आणि बाबू बँड बाजा), जितेंद्र जोशी (तुकाराम, गोदावरी आणि सेक्रेड गेम्स), सुरुची आडारकर, धनंजय मांडवकर आणि जनार्दन कदम हे प्रसिद्ध मराठी कलाकार यात आहेत.

२०१७ च्या पुरस्कार-विजेत्या 'न्यूटन' या हिट चित्रपटानंतर 'घात' या चित्रपटाने निर्माते शिलादित्य बोरा आणि मनीष मुंद्रा यांना दुसऱ्यांदा बर्लिनेल येथे जाण्याची संधी दिली आहे. राजकुमार राव अभिनीत 'न्यूटन'चा २०१७मध्ये बर्लिनेलमध्ये प्रीमियर झाला होता आणि त्यानंतर हा चित्रपट भारतातर्फे अधिकृतपणे आॅस्करसाठी पाठवण्यात आला होता.

२०२३ या वर्षाची सुरुवात अशा चांगल्या बातमीने झाल्याबद्दल निर्माते शिलादित्य बोरा म्हणाले, "घात हा चित्रपट एक शक्तिशाली आणि अद्वितीय कथानकावर आधारलेला आहे आणि माझा छत्रपाल यांच्या कलेवर खूप विश्वास आहे. बर्लिनेलसारख्या प्रतिष्ठित आणि अद्भुत व्यासपीठाच्या माध्यमातून आमचा चित्रपट जगामध्ये प्रवास सुरू करत असल्याचा आम्हाला आनंद असून, लवकरच घरच्या प्रेक्षकांसमोर हा चित्रपट सादर करण्याची योजना आहे." बोरा यांनी यापूर्वी २०१७ मध्ये प्रसाद ओक अभिनीत 'पिकासो' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष उल्लेख मिळवला होता आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे पहिले मराठी संपादन देखील बनला होता.

दृष्यम फिल्म्सचे संस्थापक-निर्माते मनीष मुंद्रा म्हणाले, "आम्ही जवळपास एक दशकापासून दृष्यम फिल्म्सच्या बॅनरखाली पुरस्कार-विजेते चित्रपट बनवत आहोत, पण 'घात' हा आमचा पहिला प्रादेषिक चित्रपट असल्याने माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. या चित्रपटासह बर्लिनेल येथे परतण्यासाठी मी खूप उत्साहित आहे आणि हे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वतोपरी मेहनत घेणाऱ्या टीमचा आभारी आहे."

या बातमीचा आनंद 'घात'च्या निर्मात्यांनी चित्रपटातील एक मनोरंजक फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करून साजरा केला आहे. २०२३ मधील उन्हाळ्यात रिलीज होणार्‍या 'घात'ची निर्मिती प्लाटून वन फिल्म्स आणि दृश्यम फिल्म्स यांनी केली आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive