हॉरर- थ्रीलर 'व्हिक्टोरिया' चं लवकरच हिंदी व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीस

By  
on  

सोनाली कुलकर्णी,पुष्कर जोग,आशय कुलकर्णी अभिनित 'व्हिक्टोरिया' हा भयपट सध्या सिनेमागृहात प्रेक्षकांचे मनसोक्त मनोरंजन करताना दिसत आहे.  13 जानेवारी रोजी चित्रपट महाराष्ट्रभरात प्रदर्शित करण्यात आला होता.  चित्रपटाच्या ट्रेलरचं दणक्यात स्वागत झालं होतं,तितकाच प्रेक्षकांचा प्रतिसाद थिएटरमध्येही पहायला मिळत आहे. मराठीत चित्रपटाला मिळत असलेलं यश पाहून आता निर्मात्यांनी 'व्हिक्टोरिया' साठी एक मोठा निर्णय घेतला आहे. चित्रपट मराठी प्रेक्षकांसोबतच आता हिंदी भाषिक प्रेक्षकांनाही एन्जॉय करता यावा यासाठी लवकरच त्याचे हिंदी डब व्हर्जन रिलीज करण्यात येणार आहे. 

व्हिक्टोरिया चित्रपटाची निर्मिती आनंद पंडित मोशन पिक्चर्स एल एल पी आणि गुसबम्स एंटरटेन्मेंट यांनी केली आहे. आनंद पंडित,रुपा पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग हे या सिनेमाचे निर्माते आहेच.  तसंच चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी या तरुण दिग्दर्शकांनी सांभाळली आहे. चित्रपटातील सस्पेन्स शेवटपर्यंत प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवताना दिसत आहे. त्यासोबतच चित्रपटाला दिलेला हॉरर टच प्रेक्षकांना भीतीनं घाबरवूनही सोडत आहे. एखाद्या हॉररपटाला आवश्यक असणाऱ्या सगळ्याच गोष्टी 'व्हिक्टोरिया' पाहताना अनुभवण्यास मिळतात. 'व्हिक्टोरिया' तांत्रिक बाबतीत उत्तम झालाय याचं पूर्ण श्रेय निर्मात्यांना..ज्यांनी चित्रपटाची निर्मिती करताना निर्मिती मूल्यात कुठेही कमतरता पडू दिली नाही. 

'व्हिक्टोरिया' चित्रपट स्कॉटलंडमध्ये देखील शूट करण्यात आला आहे. त्यानिमित्तानं चित्रपटात दाखवण्यात आलेला पॅलेस अन् इतर विलोभनीय दृश्य प्रेक्षकांना मनोरंजनाची स्पेशल ट्रीटही देत आहेत. चित्रपटातील रहस्यात प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात कलाकारांच्या अभिनयाचाही कस लागलेला दिसतो. पुष्कर जोग,सोनाली कुलकर्णी,आशय कुलकर्णी यांच्या चित्रपटातील भूमिकांनाही प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. आणि इतकं सगळं उत्तम चित्रपटाच्या बाबतीत जुळून आल्यानं तसंच त्याला मायबाप मराठी प्रेक्षकांचाही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्यानं आता हिंदीच्या तोडीचा बनलेला 'व्हिक्टोरिया' लवकरच हिंदी भाषेत डब करुन रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. 'व्हिडीओ पॅलेस' ला चित्रपटाचे सॅटेलाईट, डिजिटल आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स हक्क मिळाले आहेत.

Recommended

Loading...
Share