अवधूत गुप्तेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

By  
on  

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे गाणं आपण शालेय जीवनापासून ऐकत आलो आहे. प्रत्येक वेळेस ते ऐकताना आपला ऊर अभिमानाने भरुन येतो. आपल्या महाराष्ट्राचं हे अभिमान गीत ऐकून अंगावर रोमांच उभे राहतात.विवर्य राजा बढे लिखित ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीतामधील दोन कडव्यांना महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून हे गीत अंगीकारण्यात येणार आहे.

नुकतंच प्रसिध्द गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळाल्यानंतर कौतुक केले आहे.

 

अवधूत गुप्तेचे पत्र

प्रति
माननीय मुख्यमंत्री
महाराष्ट्र राज्य

“जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत म्हणून स्वीकारण्याच्या निर्णयाचे मी महाराष्ट्राचा नागरिक म्हणून प्रचंड कौतुक आणि स्वागत करतो !

महाराष्ट्राच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृद्धीचा सार्थ अभिमान या गाण्याच्या शब्दा शब्दात ठासून भरला आहे. तो अभिमान केवळ मराठी माणसापुरताच मर्यादित न ठेवता संपूर्ण देशाला, किंबहुना जगाला सुद्धा ऐकू जाईल इतक्या आवाजात, विविध प्रकारे, विविध ठिकाणी, विविध मार्गाने आणि विविध भाषांमधून दवंडी पिटून सांगायला हवा.

आता राज्यगीताचा सन्मान राखणं हे बंधनकारक होईल हे स्वागतार्ह परंतु. सादरीकरणाऱ्या नियमावलीमुळे या गीताचा जगभर पसरत असलेला परिमळ उलट प्रतिबंधीत होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.

काही वर्षांपूर्वी पुरोगामी विचारांनी भारताचा झेंडा फडकवण्याचे नियम शिथिल केल्याने ज्या प्रकारे आता गल्लीबोळात, नाक्या नाक्यावर तिरंगा डौलात फडकवताना दिसतो. त्याचप्रकारे आता हे नवीन महाराष्ट्र राज्यगीत महाराष्ट्राच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सतत ऐकू येवो हीच आई एकविरेचरणी प्रार्थना!

जय जय महाराष्ट्र!!”

आपला
अवधूत गुप्ते

 

Recommended

Loading...
Share