बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या पावनखिंड या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सिनेमात शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका अभिनेता अजय पुरकर यांनी साकारली होती. अजय पुरकरांनी ही भूमिका नुसती साकारलीचं नाहीतर त्यांनी ती भूमिका जगली. असं म्हणल्यास वावगे ठरणार नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना अमाप लोकप्रियतेसोबतचं खूप प्रेम देखील मिळाले.
याच अजय पुरकर यांनी विशाळगडाच्या पायथ्याशी एक घर बांधले आहे. ज्या भूमीत पावनखिंडीची लढाई झाली त्या पावनखिंडीत आपलं एक घर असावं अशी त्यांची इच्छा होती आणि ही इच्छा त्यांनी पूर्ण केलीच. या घरामुळे अनेकांनी त्याचं खप कौतुक केलं. एक छानसं घरकुल निसर्गाच्या कुशीत बांधल्याने सर्वांच्याच त्यावर नजरा खिळल्या. आता या घराबाबत त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
आता हे घर बांधून पूर्ण झालं आहे. याच घराचं रूपांतर अजय पुरकर यांनी आता व्यवसायात केलं असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली.
अजय पुरकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांचा एक व्हिडीओ पोस्ट केला. यात त्यांनी निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या नव्या घराला ‘आई-बाबांचं घर’ असं नाव दिलं असल्याचंही सांगितलं. विशाळगडाजवळ आंबा घाटात त्यांनी बांधलेलं हे घर आता त्यांनी सर्वांसाठी खुलं केलं आहे, अशी त्यांनी माहिती दिली. सर्व सोयी सुविधांनी उपलब्ध असलेल्या या घरात येऊन लोक राहू शकतात असं त्यांनी सांगितलं आणि याबद्दलची अधिक माहितीही त्यांनी या व्हिडीओतून दिली.