मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेता सुबोध भावे आपल्या सशक्त अभिनयाने रसिक प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याच्या प्रत्येक सिनेमाची, मालिकेची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. सुबोधचा खुप मोठा चाहतावर्ग आहे. त्याच्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. बायोपिक अभिनेता आणि त्यानंतर आता हर हर महादेवमुळे ऐतिहासिक भूमिका साकारणारा प्रतिभासंपन्न नट अशी ख्याती असलेला सुबोध भावे आता एका वेगळ्या पण ऐतिहासिक भूमिकेतच पाहायला मिळणार आहे.
आपल्या सोशल मिडीयावरुनच सुबोध भावेने ही माहिती दिली आहे.
सुबोध भावेनं पोस्टमध्ये लिहिलं आहे, ''लहापणापासूनच ज्याच्या गोष्टी ऐकल्या,ज्याच्या हुशारी वर प्रेम केलं त्या " बिरबल " ची व्यक्तिरेखा या आगामी वेब मालिके मध्ये साकारताना अत्यंत आनंद होतोय.
लवकरच काही दिवसात ही वेब मालिका तुम्हाला Zee 5 वर पाहता येईल''.
आता या पोस्टवरनं आपल्या सगळ्यांनाच कळालं असेल की सुबोध लवकरच बिरबलाची व्यक्तिरेखा साकारतोय अन् हिंदी वेबविश्वात त्याची घो़डदौड सुरु झाली आहे.
‘ताज- डिवायडेड बाय ब्लड’ या शोमध्ये सम्राट अकबराचा कार्यकाळ दाखवण्यात आला आहे. आपल्या भव्यदिव्य गादीसाठी पात्र वारसाच्या शोधातील अकबर यात दाखवण्यात आला आहे. अकबरानंतरच्या पिढ्या कशा उदयाला आल्या व त्यांचे पतन कसे झाले हे या मालिकेत नाट्यमय पद्धतीने दाखवले आहे. या महान घराण्याची शान व क्रौर्य यामध्ये दाखवले आहे. मुघलांना कला, काव्य व स्थापत्याबद्दल वाटणारे प्रेम आणि त्याच वेळी सत्तेसाठी स्वत:च्याच कुटुंबातील सदस्यांबाबत थंड डोक्याने त्यांनी घेतलेले निर्णय या शोमध्ये दाखवण्यात आले आहेत.
‘ताज- डिवायडेड बाय ब्लड’मध्ये कलावंतांची तगडी फौज आहे. अकबराच्या भूमिकेत नसीरुद्दीन शाह, तर अनारकलीच्या भूमिकेत अदिती राव हैदरी आहे. शहजादा सलीमच्या भूमिकेत आशीम गुलाटी, शहदाजा मुरादच्या बूमिकेत ताहा शाह आणि शहजादा दानियालच्या भूमिकेत शुभम कुमार मेहरा आहे. राणी जोधाबाईच्या भूमिकेत संध्या मृदुल, राणी सलीमाच्या भूमिकेत झरीना वहाब, मेहरुन्नीसाच्या भूमिकेत सौरसेनी मैत्रा आहे. राहुल बोस मिर्झा हकीमची भूमिका करत आहे, तर धर्मेंद्र शेख सलीम चिस्ती यांच्या भूमिकेत आहेत. या मालिकेत सुबोध भावे, आयाम मेहता, दीपराज राना, शिवानी टांकसाळे, पद्मा दामोदरन, पंकज सारस्वत, दिगंबर प्रसाद आणि झकारी कॉफिन सहाय्यक भूमिकांमध्ये आहेत.