हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास अलीकडच्या काळातील अनेक चित्रपटांतून रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळतोय. महाराजांचा, त्यांच्या शिलेदारांचा पराक्रम, त्यांचे बलिदान तसेच शिवचरित्रातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग या चित्रपटांतून मांडले गेले. त्यासाठी मराठीतील अनेक गुणी कलावंतांनी शिवरायांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारली. आता आगामी ‘रावरंभा’ या मराठी चित्रपटातून शंतनू मोघे हा गुणी अभिनेता छत्रपतींच्या व्यक्तिरेखेतून आपल्या समोर येत आहे. येत्या शिवजयंतीच्या निमित्ताने ‘रावरंभा’ चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर आपल्यासमोर प्रदर्शित झाले आहे. शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘रावरंभा’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अनुप जगदाळे यांनी सांभाळली आहे.
‘मी छोटया पडद्यावर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं होतं. या भूमिकेचं गारुड आजही प्रेक्षकांच्या मनात असताना आता मोठया पडद्यावरही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळाल्याचा आनंद अभिनेता शंतनू मोघे व्यक्त करतात. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्द्दल अभिनेता शंतनू मोघे सांगतात, की ‘रावरंभा’ हा अतिशय भव्यदिव्य व थक्क करणारा चित्रपट आहे. अभिनेता म्हणून मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की, ‘रावरंभा’ चित्रपटात ‘मला शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळतेय. ज्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाने आपला प्रेरणादायी इतिहास घडवला, समाजाला नवा विचार दिला, त्यामुळे अशी भूमिका साकारताना सोबत मोठी सामाजिक जबाबदारी नक्कीच असते.
‘रावरंभा’ चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. सहनिर्माते अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत तर कार्यकारी निर्माते महेश भारांबे, अन्वय नायकोडी आहेत. गुरु ठाकूर आणि क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना अमितराज यांनी संगीत दिले आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचे आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक, रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे, कलादिग्दर्शन वासू पाटील यांचे आहे. व्हीएफएक्सची जबाबदारी वॉट स्टुडिओ आणि जयेश मलकापूरे यांनी सांभाळली आहे. ध्वनी संकलन दिनेश उच्चील यांचे आहे.