दिग्दर्शक परेश मोकाशी आणि झी स्टुडिओज यांनी एकत्र येऊन केलेली कलाकृती ही नेहमीच अनोखी असते. परेश मोकाशी यांची खासियत म्हणजे एका सामान्य विषयालाही ते असामान्य स्वरूप देतात. ‘वाळवी’च्या माध्यमातून ते असाच एक वेगळा विषय घेऊन आले आणि प्रेक्षकांनाही हा थ्रिलकॅाम प्रचंड आवडला. झी स्टुडिओज आणि मधुगंधा कुलकर्णी निर्मित, परेश मोकाशी यांची कथा, पटकथा आणि संवाद लाभलेल्या ‘वाळवी’ या चित्रपटाने सिनेमागृहात यशस्वी अर्धशतक साजरे केले आहे. स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे आणि नम्रता संबेराव यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.
‘वाळवी’च्या यशस्वी वाटचालीबद्दल झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, ‘’वाळवी ओटीटीवर प्रदर्शित होऊनही प्रेक्षक हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहात आहेत. मुळात मराठी प्रेक्षक हा चोखंदळ आहे. त्यामुळे चांगल्या विषयांना, कथानकाला ते भरभरून दाद देतात. अनेक चित्रपट स्पर्धेत असतानाही वाळवीने आपले स्थान कायम ठेवले आहे. या सगळ्यासाठी सर्व प्रेक्षक, मराठी सिनेसृष्टी आणि सहकार्य केलेल्या सर्व चित्रपटगृहांचे मनापासून आभार. तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळेच आम्ही शतकाच्या दिशेनेही वाटचाल करू.’’
दरम्यान , झी स्टुडिओजने नुकतीच ‘वाळवी २’ची घोषणा केली आहे.