By  
on  

कामातलं समर्पण, तल्लख बुद्धी, शिस्त आणि इच्छाशक्ती यात आम्ही कधीच स्त्रियांशी बरोबरी करू शकत नाही : किरण माने

आज  ८ मार्च जागतिक महिला दिन आहे. त्यानिमित्ताने सर्वच स्तरातून स्त्री शक्तीचा जागर केला जातोय. लोकप्रिय अभिनेते किरण माने यांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एक पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी त्यांच्या स्वत:चा हात जोडतानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्याबरोबर त्यांनी एक लांबलचक पोस्ट शेअर करत सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.

 

किरण माने यांची पोस्ट

…ती गाढ झोपेत असते. अचानक कानात मोबाईल ‘आरवू’ लागतो. झोपेतच ती वैतागते. डोळे तसेच मिटून, हाताने मोबाईल चाचपून अलार्म ‘ऑफ’ करणार, तेवढ्यात तिचा मेंदू ‘ऑन’ होऊन तिला वाॅर्निंग देतो, “अगं ए..उठ. आज रेवाला सकाळची शाळाय !”… ती ताडकन उठून बसते… दिवसभरातल्या अनेक कामांची लिस्ट तिच्या डोक्यात स्क्रोल होऊ लागते…
एका ‘वर्किंग वूमन’चा दिवस भल्या पहाटे सुरू होतो !

किचनमध्ये आल्या-आल्या अनेक प्रश्नांची मालिका मनात सुरू होते. नाष्टा काय करायचा? दुपारच्या जेवणाचं काय? मला १० वाजता कामावर जायचंय त्याआधी संध्याकाळच्या जेवणाची काय तयारी करायची??? हे सुरू असतानाच ती किचनमधली रात्रीची भांडी जेवढी गरजेची असतील ती धुवून टाकते.. एकीकडे चहाचे आधण ठेवते… फ्रिजमधून दूध काढून तापायला ठेवते…आज कामवालीही येणार नाही म्हणून झाडू मारायला घेते. “रेवा उठ, सकाळ झाली. स्कूलमध्ये जायचं नाही का?” असं साधारणपणे दहावेळा ओरडल्यावर आणि एकदा तिला गदागदा हलवून उठवल्यावरच ती जागी होते.

…सगळं आवरून रेवाला शाळेत पाठवण्याचं मोठं काम पार पडल्यानंतर दोन घटका शांतपणे ती खुर्चीत बसते. चहाचा पहिला घोट घेतानाच तिच्या मैत्रीणीचे, वैशालीचे शब्द तिला आठवतात, “नेहा, सकाळ सकाळी जिर्‍याचं पाणी पित जा. चमचाभर जिरे आदल्या रात्री भिजत ठेवायचे. तब्येतीसाठी चांगलं असतं.” ती मनातल्या मनात म्हणते, “रात्री विसरलेच. उद्यापासून सुरू करेन.” असं ती रोज ठरवतेय.

…पण विशेष म्हणजे आपल्या कुटूंबाची काळजी घेताना, त्यासाठी धडपडताना तिची अजिबात तक्रार नसते बरं का ! मुळात तिला आपण हे वेगळं काहीतरी करतोय असं वाटतच नसतं. पण त्याचवेळी ती थकली असेल, तिला मदत करू असा विचार करणारे तिचे कुटूंबीय खूप कमी असतात हे ही खरं… असो.

…तर नवर्‍याच्या ब्रेकफास्टपासुन टिफीनपर्यन्तचे सगळे सोपस्कार पार पाडून ती तिच्या आयुष्यातली तिची दुसरी भुमिका साकारण्यासाठी सज्ज होते… बॅंकेतील क्लार्कची ! बॅंकेत पोहोचल्यावरही ती अनेक जबाबदार्‍या खांद्यावर घेते. बँकेतील व्यवहार हाताळणे, कॅश मोजून माहिती काॅम्प्यूटरमध्ये भरणे, ज्या वयोवृद्ध, अशिक्षित ग्राहकांना फाॅर्म भरण्यात अडचण येते त्यांना मदत करणे, पासबुकांची एंट्री करून देणे, याशिवाय कुणाला कुठल्या स्कीमबद्दल माहीती हवी असल्यास ती देणे…पूर्ण दिवसभर इथेही ती तशीच उत्साहाने सळसळणारी असते !

अशा अनेक वर्किंग विमेन आज आपल्या आसपास आहेत. एक उदाहरण म्हणून मी बॅंक घेतलं. क्षेत्र कुठलंही असो, दिनचर्या हीच असते…आपलं कौटुंबिक आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य याची सांगड घालताना वर्किंग वुमनला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचा त्याग म्हणजे ‘स्वत:साठीचा वेळ’ !

…काम करणारे पुरूष आरामासाठी शनिवार रविवारची वाट पहातात. पण वर्किंग वुमनने हे सुट्टीचे दिवसही घरासाठी वाहिलेले असतात. आणि यातूनच बाॅक्सिंग किंवा कुस्तीमध्ये सुवर्णपदक पटकावण्यापासून देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यन्त मजल मारण्यापर्यन्त काहीही करायला ही स्त्री सक्षम असते.

कामातलं समर्पण, तल्लख बुद्धी, शिस्त आणि इच्छाशक्ती यात आम्ही कधीच स्त्रियांशी बरोबरी करू शकत नाही. स्त्रियांकडे संकटाशी लढण्याची आणि राखेतून विश्व उभं करण्याची असामान्य हिंमत आणि ताकद असते. या जगात जर पोलादाहून मजबूत आणि मेणाहून मऊ जर कुणी असेल तर ती ‘स्त्री’ ! महिला दिनानिमित्त घर सांभाळून नोकरी, व्यवसाय करणार्‍या सगळ्या सावित्रीच्या लेकींना कडकडीत सलाम ! असे किरण माने यांनी म्हटले आहे.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive