'रक्तामंदी उसळं तापता लाव्हा शिवराय शब्दाची आन आम्हाला
वैऱ्याच्या रक्तानं गड भिजवू जिंकून नाचवू ध्वज भगवा
आले मराठे आले मराठे आदी न अंत अश्या शिवाचे(महादेवाचे)
मोडीतो वैऱ्याची मुंडकी मोजून पाच्छाई झोडती असे मराठे
स्वराज्यनिष्ठा व लढवय्येपणाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेत त्यांना अनेक सहकाऱ्यांची मौल्यवान साथ मिळाली. त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढण्याची शपथ घेतली आणि पूर्णत्वाला नेली. महाराजांच्या या जीवलग शिलेदारांपैकी एक म्हणजे सुभेदार तान्हाजी मालुसरे.
मराठा स्वराज्याचा ज्वलंत आणि स्फूर्तीदायी इतिहास कायमच आपल्याला प्रेरणा देत असतो. मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णपान म्हणजे नरवीर तान्हाजी मालुसरे. तान्हाजी मालुसरे यांचे कल्याणकारी जीवनकार्य तसेच स्वराज्यासाठीच्या बलिदानाची तेजस्वी यशोगाथा मांडणारा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प असलेला ‘सुभेदार’ चित्रपट जून २०२३ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर ‘शिवभक्त प्रतिष्ठान’ आयोजित समारोहात १५ हजार शिवभक्तांच्या साक्षीने कलाकार, तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.
'शिवराज अष्टक'मधील 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' आणि 'शेर शिवराज' चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर ‘सुभेदार’ या पाचव्या चित्रपुष्पासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती मुळाक्षर प्रोडक्शन, राजवारसा प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे. दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, प्रद्योत पेंढारकर, अनिल वरखडे, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत