दिग्दर्शक केदार शिंदे शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. या चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. आता या चित्रपटाचा दमदार टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. विशेष म्हणजे केदार शिंदे यांची लेक सना शिंदे या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. तर मराठीतील कसदार अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसणार आहे.
महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या आठव्या स्मृतीदिनी केदार शिंदे दिग्दर्शित शाहिरांचा जीवनपट ‘महाराष्ट्र शाहीर’ या मराठी चित्रपटाचा टीझर महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष मा. राज ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित झाला आहे. यावेळी शाहिरांच्या पत्नी श्रीमती राधाबाई कृष्णराव साबळे, दिग्दर्शक केदार शिंदे, प्रमुख कलाकार अंकुश चौधरी, सना केदार शिंदे, निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे, संगीतकार अजय-अतुल, आणि पटकथा-संवाद लेखिका प्रतिमा कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित राहिले होते.
'महाराष्ट्र शाहीर'
अस्सल मातीतला लोककलावंत, सह्याद्रीचा सिंह आणि जना मनातला आवाज, म्हणजे शाहीर साबळे..!
अवघ्या महाराष्ट्रातील रसिकवर्गाला ज्याची आतुरता आहे त्या 'महाराष्ट्र शाहीर' चा टीझर येतोय २० मार्च रोजी.#MaharashtraShaheerTeaser@mekedarshinde @sgchhabria @EverestMarathi pic.twitter.com/FXIHxzXqjp— Kedar Shinde (@mekedarshinde) March 19, 2023
टीझरमधून या चित्रपटात शाहिरांच्या आयुष्यातील विविध पैलू उलगड्णार असल्याचं दिसतंय. चित्रपटात शाहीर साबळेंच्या आयुष्यातील महत्वाच्या आणि दिग्गज व्यक्ती पाहायला मिळत आहेत. यामध्ये बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण तसेच गानसम्राज्ञी लतादीदींचा देखील समावेश आहे. त्यामुळे हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी खास पर्वणीच असणार आहे
'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट येत्या २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.