मराठी सिनेमांचे बेताज बादशाह. विनोदी भूमिकांचे हुकमी एक्के आणि अष्टपैलू अभिनेते म्हणजे अशोक सराफ. अभिनय करण्यासाठी वय हा फक्त एक आकडा आहे, हे त्यांनीच सिध्द केलंय. यंदा 75 री ओलांडली तरी अलिकडेच आलेल्या वेड या सिनेमातून त्यांनी आपल्या अभिनयाची जादू कायम असल्याचं दाखवून दिलं. अशोक मामा हे अशोक मामा आहेत. त्यांच्या सारखा दुसरा नट होणे शक्य नाही.
नुकतंच झी चित्र गौरव हा शानदार पुरस्कार सोहळा पार पडला. अनेक दिग्गज कलाकार या सोहळ्यासाठी उपस्थित होते. या सोहळ्यात अशोक सराफ यांना झी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
झी मराठीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ झी गौरव पुरस्कार सोहळ्यामधीलच आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ जाधवच्या एका कृतीमुळे सर्वच भारावून गेलेले दिसून येत आहेत. अभिनेत्याच्या त्या परफॉर्मन्सने सर्वच भावुक होत, कलाकारांच्या डोळ्यातून अश्रू येताना दिसत आहेत.
अशोक सराफ यांना इंडस्ट्रीत मामा म्हणून ओळखलं जातं. लहान-वयोवृद्ध सर्वच कलाकार त्यांना मामा म्हणूनच बोलावतात. या व्हिडीओमध्ये सिद्धार्थ जाधव मामांच्या गाण्यांवर आणि त्यांच्याच गेटअपमध्ये एक सुंदर परफॉर्मन्स सादर करतो. आणि परफॉर्मन्स होताच तो पळत अशोक सराफांजवळ जाऊन त्यांच्या पायात नतमस्तक होतो. या क्षणाने मामा भारावून जातात. आणि त्यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू यायला लागतात. दरम्यान यावेळी मामाच नव्हे तर सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, अलका कुबलसह, प्रिया बापट, सई ताम्हणकर, रितेश देशमुख सर्वच कलाकारांचे डोळे पाणवतात सर्वच त्या क्षणात भारावून गेलेलं दिसले.