'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरची सर्वात लोकप्रिय मालिका. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या लाडक्या आहेत. यात अभिच्या पत्नीच्या भूमिकेतील अनघा म्हणजेच अभिनेत्री अश्विनी महांगडेचा सुध्दा मोठा चाहता वर्ग आहे. यापूर्वी ती स्वराज्यरक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेत राणूअक्का म्हणून घराघरांत पोहचली. आता 'आई कुठे काय करते'मुळे ती प्रेक्षकांची लाडकी बनलीय. अश्विनी सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असते. विविध पोस्ट ती शेयर करते. पण नुकतंच एक खास पोस्ट शेयर करत तिने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
अश्विनीने नुकतीच केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे. तिने तिच्या शेतातील एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओत ती शेतात काम करताना दिसतेय. हा व्हिडिओ शेअर करत तिने बळीराजाचं राज्य येऊ दे अशी प्रार्थना केली आहे.
अश्विनी मालिकेत काम करण्यासोबत गडकिल्लाच्या संवर्धनासाठीही काम करताना दिसते. ती अनेक सेवाभावी संस्थांशीसुध्दा जोडली गेली आहे. ती नेहमीच समाजभान जपताना पाहायला मिळते. मागच्या वर्षी कोरोना काळात तिच्या वडिलांचं नानांचं निधन झालं. मात्र त्यानंतर ती आणखी जोमाने कामाला लागली. खंबीरपणे आपल्या कुटुंबाच्या पाठीशी उभी राहिली. अश्विनीने तिच्या शेतातला एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती ज्वारीची कणसं गोळा करताना दिसतेय. ती ज्वारीच्या पाट्या उचलून पोत्यात भरतेय.
अश्विनी पोस्टमध्ये लिहते, 'रात दिस मेहनत करी, खाई कष्टाची भाकरी, पोसतो ही दुनिया सारी, माझा बाप शेतकरी. जगाचा पोशिंदा: बळीराजा. कोणताच राजकारणी किंवा सिस्टम शेतकर्याला जगवत नसते तर शेतकरीच या सर्वांना जगवत असतो आणि हेच ऊन, वारा पावसासारखे शाश्वत सत्य आहे. ईडा पिडा टळूदे आणि बळीचे राज्य येऊदे. मी घातलेला शर्ट माझ्या वडीलांचा (नानांचा) आहे. नानांची मायेची ऊब, आम्हा सगळ्यांचे उन, वारा, पाऊस, आलेली संकटं यापासून कायम रक्षण केले त्याची जाणीव मनात कायम आहे.
अश्विनीच्या या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव तर होतच आहे. पण तिचा उत्साह वाढवणा-या एकापेक्षा एक प्रतिक्रियासुध्दा तिला मिळत आहेत.