बिग बॉस मराठी २ चा विजेता शिव ठाकरे हिंदी बिग बॉस १६ मुळे चर्चेत आहे. त्याच्या खेळाचं -स्ट्रॅटेजी प्लॅन करण्याचं प्रचंड कौतुक झालं. पहिला रनर अप ठरलेल्या शिवला ट्रॉफीवर नाव कोरता आलं नसलं तरी नेहमीप्रमाणेच त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली . त्याचा चाहता वर्ग खुप मोठा आहे. शिवच्या प्रसिध्दीत तसूभरही फरक पडलेला नाही. तो जिथो जातो तिथे चाहत्यांचा गराडा असतो.
काही दिवसांपूर्वीच त्याने स्वप्नपूर्ती केली. नवी कोरी ब्रॅण्डेड कार विकत घेतली. तसंच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर स्वताचा चहाचा खास ब्रॅण्ड लॉंच केला. यशाची अनेक शिखरे तो पादाक्रांत करतोय. पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोप्पा नव्हता. यासाठी खुप संघर्ष त्याला करावा लागाला.अमरावती सारख्या छोट्या शहरातून आलेला शिव मेहनतीच्या जोरावर आज आपलं नाव कमावून आहे.
‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत शिव ठाकरेने कास्टिंग काउचबद्दलचा अनुभव सांगितला. तो म्हणाला, “मी एकदा आराम नगरमध्ये ऑडिशनसाठी गेलो होतो आणि तिथे एक माणूस मला बाथरूममध्ये घेऊन गेला आणि म्हणाला, ‘इथे मसाज सेंटर आहे’. मला ऑडिशन आणि मसाज सेंटरचा संबंध लक्षात आला नाही. तो मला म्हणाला, ‘ऑडिशननंतर एक वेळा तू इथे ये. तू वर्कआउटपण करतोस का…’ त्यानंतर मी तिथून बाहेर पडलो. कारण तो कास्टिंग डायरेक्टर होता आणि मला कोणताही वाद घालायचा नव्हता. मी सलमान खान नाही. पण या घटनेनंतर मला एक गोष्ट लक्षात आली की कास्टिंग काउचच्या बाबतीत स्त्री आणि पुरुष यांच्यात भेदभाव केला जात नाही.”
शिवने आणखी एका प्रसंगाबद्दल भाष्य केलं. “चार बंगल्यात एक मॅडम होत्या. त्या मला म्हणायच्या, ‘मी याला स्टार बनवलं, मी त्याला स्टार बनवलं.’ त्या मला रात्री ११ वाजता ऑडिशनसाठी बोलावत होत्या. मी एवढाही भोळा नाही की रात्री काय ऑडिशन्स होतात, हे मला समजत नसेल. मला काम आहे, त्यामुळे येऊ शकत नाही, असं मी त्यांना सांगितलं. यावर त्या म्हणाल्या, ‘तुला काम नाही करायचं का?’ ‘तुला इंडस्ट्रीत काम मिळणार नाही’, असं मला बोलण्यात आलं.