ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचं मराठी सिनेसृष्टीतील योगदानअमूल्य आहे. त्यांच्या निधनाला आता 14 वर्षांचा काळ लोटलाय. आता त्यांच्या जयंतीनिमित्त मुलगी गार्गी फुलेने मोठी घोषणा केली आहे. गार्गी यांनी वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत कलाक्षेत्रामध्ये काम करणं पसंत केलं आहे .मराठी मालिकांमधून त्या आपल्या अभिनयाचा ठसा उमटवतात.
वडिलांच्या जयंतीनिमित्त गार्गीने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याचबरोबरीने तिने निळू फुले यांचा फोटोही शेअर केला आहे. गार्गी म्हणाली, “वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा. आज तूझ्या वाढदिवसानिमित्त ‘निळू फुले सन्मान’ या तुझ्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची पुन्हा एकदा घोषणा करत आहे. याचा अत्यंत आनंद होत आहे. ७-८ तारखेला सगळ्यांनी जरूर या. वाट पाहते”.
‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री गायत्री दातारच्या आईची भूमिका गार्गी यांनी साकारली होती. .
निळू फुले यांची मराठी नाटक आणि चित्रपटातील एक महान अभिनेते म्हणून ओळख आहेत. 1930 मध्ये पुण्यातील एका गरीब कुटुंबात त्यांच्या जन्म झाला होता. ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या मराठी लोकनाट्यापासून त्यांच्या करियरला सुरुवात झाली होती. त्यानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. 1956 मधील ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटापासून त्यांची चित्रपटसृष्टीत सुरुवात झाली होती. निळू फुले हे दृष्ट खलनायकाच्या भूमिकांसाठी ओळखले जात होते. त्यांचा अभिनय इतका उत्कृष्ट असे की महिलांना खऱ्या आयुष्यातही ते खलनायक वाटत असे.
त्यांचा भारदस्त आवाज आणि संवादकौशल्यासाठीही ते ओळखले जात होते. मराठी चित्रपटांमधील त्यांचे डायलॉग हे आजही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध डायलॉगपैकी एक आहेत. ‘पिंजरा’, ‘सामना’, ‘सिंहासन’ या चित्रपटातीलही त्यांचे काम उल्लेखनीय होते. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘कुली’, दिलीप कुमार यांच्यासोबत ‘मशाल’, अनुपम खेर यांच्यासोबत ‘सारांश’ अशा सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होत. चित्रपटांमध्ये खलनायक साकारणारे फुले हे खऱ्या आयुष्यात मात्र हिरो होते.