शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित केदार शिंदेंचा महाराष्ट्र शाहिर हा सिनेमा सध्या प्रचंड चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या या महान लोककलावंताची महती आजच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी केदार शिंदे ही अप्रतिम कलाकृती घेऊन आले आहेत. नुकताच या सिनेमाचा दमदार ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सुपरस्टार अंकुश चौधरी ह्यात शाहिर साबळेंच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळतोय. तर त्यांच्या पत्नीच्या भानुमतीच्या भूमिकेत केदार शिंदेची लेक सना शिंदे . या सिनेमाद्वारे ती पदार्पण करतेय.
ट्रेलरमधून शाहीर साबळे यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर प्रकाश टाकण्यात आला आहे. अगदी लहानपणापासून ते महाराष्ट्र शाहीर बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास आता मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. महाराष्ट्राची लोकधारा’मधून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलेली लोककला याचं चित्रणसुद्धा यात आपल्याला बघायला मिळणार आहे. शिवाय याच्या टीझरमधून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी, लता मंगेशकर यांची झलकही पाहायला मिळाली होती. या दिग्गज लोकांचा शाहीर यांच्या आयुष्यात असलेलं स्थान ह्यावरसुध्दा प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
अंकुश चौधरी आणि सना शिंदे यांच्या सोबतच सिनेमात निर्मिती सावंत, अतुल काळे, शुभांगी सदावर्ते, शेखर फडके, दुष्यंत वाघ, मृण्मयी देशपांडे आदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.
महाराष्ट्र शाहिर सिनेमाती अजय-अतुलचं संगीत असलेली गाणी प्रचंड लोकप्रिय होतायत. बहरला हा मधुमास आणि गाऊ नको किसना या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच अधिराज्य गाजवलंय.
येत्या 28 एप्रिलला महाराष्ट्र शाहिर हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होतोय.