अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर अभिनेत्री ह्रता दुर्गुळे हिने मालिकाविश्वात आपलं मोठं स्थान निर्माण केलं, छोट्या पडद्यावरची लाडकी नायिका अशी तिची ओळख. पण आता मराठी सिनेमांचीसुध्दा ती एक आघाडीची नायिका बनलीय. टाईमपास 3, अनन्या आणि सर्किट अशा सिनेमांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. सोशल मिडीयावरसुध्दा ह्रताचा खुप मोठा चाहता वर्ग आहे.
सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ या प्रसिध्द युट्यूब कार्यक्रमात ऋताने एक प्रसंग सांगितला. एका पार्टीदरम्यान तिच्यावर करण्यात आलेल्या कमेंटबाबत तिने भाष्य केलं. ती म्हणाली एका व्यक्तीने म्हटलं, "बरं झालं ह्रताचं वजन वढतंय. आता तिला काम मिळणार नाही आणि तिची कामं आम्हाला मिळतील." ह्रता म्हणाली, ती या पार्टीत नव्हती, परंतु तिच्या जवळच्या एका व्यक्तीने याबाबत तिला सांगितलं. त्यावेळेस मां वजन वाढलं होतं, असं ह्रता सांगते. हा अलिकडेच घडलेला प्रसंग आहे.
ह्रता पुढे सांगते, मला काही बोलावं लागत नाही, कारण माझं काम बोलतं. पण माझ्याबाबत केलेली अशी कमेंट ऐकून मला असं वाटलं की, लोक आपल्याबाबत असं कसं बोलू शकतात? स्पर्धा ही सगळीकडेच आहे. मला काम मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी करण्याची गरज वाटत नाही. मी तोंडावर स्पष्ट बोलते.