अस्मिता, स्वराज्यरक्षक संभाजी आणि आता आई कुठे काय करतेया मालिकांमुळे घराघरांत पोहचलेली गुणी अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. अश्विनी सधया चर्चेत आहे ती केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहिर सिनेमामुळे. या सिनेमात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतेय. या चित्रपटाच्या निमित्ताने तिला अनेक छान अनुभव आले. आता तिने केलेली एक पोस्ट खूप चर्चेत आली आहे.
केदार शिंदेंसाठी अश्विनीने ही खास पोस्ट लिहली आहे. तसंच एक विलक्षण योगायोगसुध्दा या निमित्ताने घडला आहे. अश्विनीने तिचा केदार शिंदेंबरोबरचा एक फोटो पोस्ट करत लिहिलं, “केदार सरांनी “वाई युवक केंद्र, वाई” मधून “बॉम्ब – ए- मेरी जान” ‘ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेसाठी दिग्दर्शित केलेले. ज्यात प्रदीपकुमार महांगडे म्हणजे माझे वडील नाना, युनूस काका पिंजारी, मुनीर काका बागवान या सर्वांनी अगदी उत्तम कामे केली होती. लहानपणापासून “केदार शिंदे” हे नाव ऐकत होते. कधीतरी त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळावी हे वाटणे स्वाभाविक आहे. तशी वेळ आली जेव्हा “सुखी माणसाचा सदरा ” या मालिकेसाठी ऑडिशन दिले. पण तेव्हा माझे casting झालेच नाही. आणि मी जरा निराशच झाले.”
अश्विनी पुढे लिहते, "‘महाराष्ट्र शाहीर “मुळे केदार सरांसोबत काम करता आले, शिकता आले. त्यांच्यात सकारात्मकता तुफान आहे. या चित्रपटाच्या शूट दरम्यान जे शिकता आले, अनुभवता आले ते सगळे अप्रतिम अनुभव आहेत. पूर्ण युनिट हाताळणे, त्यांचा बाप होवून प्रेमाने आणि प्रसंगी थोडे कठोर बोलून काम उत्तम करून घेणे हे तसे अवघड, काम उत्तम व्हावे यासाठीची तगमग, जबाबदारी पार पाडणे हेही अवघड. पण आम्हाला सोप्पे करून ते जग दाखवले त्यासाठी मी केदार सरांची ऋणी आहे आणि राहीन.”
आता तिच्या या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे व सगळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करतायत.