धर्मवीर या ब्लॉकब्लस्टर सिनेमानंतर अभिनेता प्रसाद ओककडून प्रेक्षकांच्या अपेक्षा खुपच उंचावल्या आहेत. लवकरच प्रसाद ओक एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. ‘परिनिर्वाण’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच या चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनाला ‘महापरिनिर्वाण दिन’ असे म्हटले जाते. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे निर्वाण झाले. त्यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला होता. संपूर्ण विश्वाचा श्वास रोखून धरणारा हा ऐतिहासिक क्षण या चित्रपटात उलगडण्यात येतील.
प्रसाद ओकने नुकतंच इन्स्टाग्रामवर याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘परिनिर्वाण’ या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये ‘६ डिसेंबर १९५६, संपूर्ण विश्वाचा श्वास रोखून धरणारा ऐतिहासिक क्षण, भारतीय संविधानाचे शिल्पकार, संस्थापक, बहिष्कृत हितकारिणी सभा, प्रत्येक प्रौढ नागरिकाला मतदान अधिकार, भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे जनक, हिंदू कोड बिल, राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अशा गोष्टी लिहिलेल्या दिसत आहेत.
त्याबरोबरच या पोस्टरमध्ये “६ डिसेंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण झाले आणि त्याच दिवशी…. सत्य घटनेवर आधारित एका कलावंताच्या आयुष्याचं स्वप्न, प्रेम, त्याग, संघर्ष, दु:ख, जतन केला त्याने इतिहासाचा अमूल्य ठेवा… एक कॅमेरामन, ३००० फुटांची रीळ आणि लाखो लोकांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ‘निर्वाण यात्रा’. चित्रीकरणाच्या उद्देशाने झपाटलेला एक अवलिया कलाकार नामदेव व्हटकर”. असे या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये लिहिण्यात आले आहे.