मराठीतील प्रसिध्द दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी सिनेमाप्रमाणेच त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने सुरू केलेल्या सुका-सुखी या हॉटेलची बरीच चर्चा रंगली होती. आता खुद्द महेश मांजरेकरांनीच हे हॉटेल सुरु करण्यामागचं कारण स्पष्ट करणारा एक व्हिडीओ शेयर केला आहे. मांजरेकर आणि त्यांच्या कुटुंबाची खवय्येगिरी सगळ्यांनाच माहिती आहे. मांजरेकरांच्या घरचं जेवण, त्यांचा पाहुणचार याबद्दल अनेकदा सेलिब्रिटी बोलताना दिसतात. आता त्यांच्या घरातल्या पदार्थांची चव आता चाहत्यांनाही चाखता येणार आहे.
'आम्ही हे नवीन हॉटेल सुरू केलंय. इथं अस्सल मालवणी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. माझ्या घरी जे जेवण बनवलं जातं, ते लोकांना द्यायचं होतं. मी बऱ्याच ठिकाणी फिरलो, पण फार कमी ठिकाणी घरच्या सारखं जेवण मिळतं. विचार केला आपणच का सुरू करू नये... म्हणून आम्ही हे सुका सुखी हॉटेल सुरू केलंय. इथं बनवले जाणारे सगळे पदार्थ मसाले असो किंवा तेल...माझ्या घरचे असतात' , असं मांजरेकरांनी या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
सत्या मांजरेकरने आता अभिनया सोबतच बिझनेसची वाट धरली आहे. सुकी मच्छी हा या हॉटेलच्या मेन्यू कार्डवरचा खास मेन्यू आहे. आता खुद्द महेश मांजरेकरांनीही लेकाच्या या हॉटेल व्यवसायला त्यांच्या हटके पद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहेत.