By  
on  

" मला अंकुश चौधरी नाही आवडायचा...." बाळासाहेब साकारणा-या अभिनेत्याची हदयस्पर्शी पोस्ट

बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटातून शाहीर साबळे यांचा जीवनप्रवास पडद्यावर उलगडणार आहे. अंकुश चौधरी या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारत आहे. तर सना शिंदेंने शाहीर साबळेंच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.या दोघांशिवाय महाराष्ट्राला घडवणा-या  अनेक असामींच्या व्यक्तिरेखा यात पाहायला मिळतील. यापैकीच बाळासाहेब ठाकरेंच्या व्यक्तिरेखेने लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेता दुष्यंत वाघ या सिनेमात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साकारतोय.

अभिनेता दुष्यंत वाघ याने सिनेमा प्रदर्शनानंतर अभिनेता अंकुश चौधरी व संपूर्ण ह्या सिनेमाच्या अनुभवाविषयी एक खास पोस्ट केलीय. 

 

दुष्यंत वाघची पोस्ट 

मला अंकुश चौधरी नाही आवडायचा..

मी college ला असताना 'सावरखेड - एक गाव' ही फिल्म release झाली होती आणि माझ्या ताईला
अंकुश चौधरी प्रचंड आवडला होता. तिने घरात पोस्टर्स आणून लावली होती त्याची.
मी घरात सगळ्यांत लहान त्यामुळे मला मिळणारं प्रेम, attention हे वाटून घ्यायची सवय नव्हती. त्यात ताईचा माझ्यावर विशेष जीव. त्यामुळे तिला अजून कोणी आवडू शकतो हे माझ्यातल्या लहान भावाला पटेना. त्यात घरात माझ्या फोटोज् पेक्षा जास्त आणि मोठे फोटोज् दुसऱ्या कोणाचे आहेत हे बघून जास्तच राग येई.

पण जेंव्हा आदित्य सरपोतदार ह्यांचा 'उलाढाल' पहिला अन् अंकुशनी साकारलेला 'विकी' बघितला, तेंव्हा पहिल्यांदा त्याच्या मधला कलाकार भावला मला. त्यानंतर 'चेकमेट' मधल्या 'विशाल'ने मनात घर केलं आणि मनाचा ताबा घेतला तो 'दुनियादारी'मधल्या 'दिग्या'ने.

मग कळलं की हा अभिनेता मलाही आवडायला लागला आहे. हळूहळू त्याच्या films, जुनी कामं जमतील तशी बघत राहिलो. त्याचे interviews बघितले. अन् एक दिवस दादरला Gypsy कॉर्नर जवळ अंकुश दादा स्वतः भेटला. केदार दादा (शिंदे) ह्यांनी ओळख करून दिली. अन् मी काही सांगायच्या आधीच त्याने मला मिठी मारली अन् म्हणाला ' छान काम करतोस, खूप मोठा हो..'
मला खूप अपराधी वाटलं. का उगाच राग राग केला ह्याचा..? आपण किती लहान आहोत ह्याच्या समोर. सर्वार्थाने..
पण त्या दिवशी त्याच्या मनाची श्रीमंतीही जाणवली.
त्यानंतर जेव्हा जेव्हा दादा भेटला, तेव्हा तेव्हा कायम 'दादा' सारखाच भेटला. कायम जमिनीवर राहून, सर्वांना प्रेमाने वागवून, उत्तुंग काम करणारा मेहनती कलाकार!

अन् आज 'महाराष्ट्र शाहीर'च्या निमित्ताने त्याच्यासोबत काम केलं तिथेही तसंच. स्वतः सोबत, माझं काम छान कसं होईल हे जातीने बघणारा, सल्ले देणारा सहकलाकार. प्रेमळ, अजिबात गर्व नसलेला उमदा माणूस.
आणि काय कमाल काम केलेयस दादा, शाहीर हुबेहूब उभे केलेस तू! सलाम..

दादा.. तुला हे सांगू शकलो नाही कधी. पण तुझा केलेला राग राग मन खात होता. कदाचित बोलू शकणारही नाही तू समोर असताना. म्हणून जाहीरपणे sorry..

तुझ्यासारखं होण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.
खूप खूप प्रेम️

केदार दादा.. तुझ्यासोबत काम करायला मिळणं आणि त्यातही बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी तू मला निवडणं हा दुग्धशर्करा योगच आहे. इतकी मोठी जबाबदारी मला दिलीस. काय बोलू ह्यावर? खूप खूप Thanku️
शाहीर आम्हाला कळले ते तुझ्या प्रयत्नांमुळे. तू घेतलेली मेहनत ठायी ठायी दिसते रे प्रत्येक frame मध्ये.

आपली संस्कृती, आपला इतिहास, मराठीचा समृद्ध वारसा म्हणजेच महाराष्ट्र शाहीर..
Proud to be a part of this film..

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive