बहुचर्चित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटातून शाहीर साबळे यांचा जीवनप्रवास पडद्यावर उलगडणार आहे. अंकुश चौधरी या चित्रपटात शाहीर साबळे यांची भूमिका साकारत आहे. तर सना शिंदेंने शाहीर साबळेंच्या पहिल्या पत्नी भानुमती यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.या दोघांशिवाय महाराष्ट्राला घडवणा-या अनेक असामींच्या व्यक्तिरेखा यात पाहायला मिळतील.
अजय अतुल यांचं संगीत असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक सांगीतिक पर्वणीच आहे. अशातच आता केवळ सामान्य प्रेक्षकच नाही तर राजकारणी मंडळींना देखील हा चित्रपट पाहण्याचा मोह आवरला नाही. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी हा चित्रपट पहिला असून त्यांनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरली आहे.
शरद पवारांसाठी या चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला होता. त्यांनी कुटुंबासहित येऊन हा सिनेमा पहिला आणि नंतर आपली प्रतिक्रिया नोंदवली. हा चित्रपट पाहिल्यानंतर शरद पवार म्हणाले कि , 'शेवटचं गाणं सुरु झालं आणि मी अंकुशला पूर्णतः विसरून गेलो, मला फक्त शाहीर साबळे दिसत होते.' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.