प्रसिध्द अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी छत्रपतींच्या भूमिकेतून संपूर्ण महाराष्ट्राला आपलंसं केलं. त्यांचे 'शिवपुत्र संभाजी' या नाटकाचे प्रयोग पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड गर्दी करतात. संपूर्ण महाराष्ट्रभर याचे प्रयोग रंगतायत. काही दिवसांपूर्वीच एका प्रयोगादरम्यान त्यांना गंभीर दुखापत झाली होती. नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्यांचा अपघात झाला होता. पाठीला मार बसूनही त्यांनी तो प्रयोग पूर्ण केला आणि त्यानंतर त्यांना ताबडतोब इस्पितळात नेण्यात आलं. आता त्यांच्या प्रकृतीबद्दल काही अपडेट समोर आली आहे.
सोशल मिडीया पोस्टद्वारे अमोल यांनीच याबाबत सांगितलं आहे. अमोल यांनी एक फोटो पोस्ट करत त्यांच्या तब्येतीची माहिती दिली आहे. त्यांनी त्यांचा रुग्णालयातील फोटो शेअर केला आणि लिहिलं, 'काळजी करण्याचं काही कारण नाही!!! पुढे झेप घेण्यासाठी दोन पावलं मागे यावं लागतं! थोडीशी सक्तीची विश्रांती. परंतु दुखापत फार गंभीर नाही. लवकरच भेटू 11 मे ते 16 मे हिंदुस्थान अँटिबायोटिक्स ग्राउंड, पिंपरी येथे 'शिवपुत्र संभाजी' महानाट्य!!!'
रविवारी ३० एप्रिल रोजी प्रयोग सुरू असताना घोड्यावर बसताना त्यांचा पाय दुमडला गेला आणि ते घोड्यावरून खाली कोसळले. त्यांच्या पाठीला जबर मार बसला. तरीही पेन किलर खाऊन त्यांनी तो प्रयोग पूर्ण केला आणि त्यानंतरच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.