नुकतेच 'कैरी' या चित्रपटाचे लंडनमध्ये चित्रीकरण पार पडले. हा चित्रपट नेमका कशावर आधारित आहे, हे जरी अद्याप कळले नसले तरी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोंवरून या चित्रपटात सुबोध भावे, सायली संजीव, सिद्धार्थ जाधव आणि शशांक केतकर यांच्या प्रमुख भूमिका असल्याचे कळतेय. याव्यतिरिक्त या चित्रपटात अरुण नलावडे, सुलभा आर्या आणि काही ब्रिटिश कलाकारही आहेत. 'कैरी'चे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक शंतनु रोडे यांनी केले असून यापूर्वी त्यांनी गोष्ट 'गोष्ट एका पैठणीची'चे दिग्दर्शक केले होते. 'कैरी'च्या निमित्ताने पुन्हा एकदा पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक - अभिनेत्री म्हणजेच शंतनु रोडे आणि सायली संजीव ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय 'कैरी'चे 'पोस्टर'ही झळकले असून त्यात एक पाठमोरी मुलगी हातात सामान घेऊन परदेशात फिरताना दिसतेय. त्यामुळे आता हा चित्रपट काय असेल, हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.
या चित्रपटाची निर्मिती नवीन चंद्रा, नंदिता राव कर्नाड यांनी ९१ फिल्म स्टुडिओज बॅनर अंतर्गत केली असून निनाद बत्तीन, तबरेझ पटेल, एव्हीके एंटरटेनमेंट सहनिर्माते आहेत. ' कैरी'चे लेखन स्वरा मोकाशी आणि शंतनु रोडे यांनी केले आहे.
९१ फिल्म स्टुडिओजचे सीईओ नवीन चंद्रा यांनी आतापर्यंत दहा प्रादेशिक चित्रपटांची निर्मिती केली असून यात मराठी, मल्याळम, बंगाली आणि पंजाबी भाषांचा समावेश आहे.
९१ फिल्म स्टुडिओजचे सीईओ नवीन चंद्रा म्हणतात, '' हा आमचा तिसरा मराठी चित्रपट आहे. अतिशय प्रतिभाशाली कलाकारांसोबत आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमसोबत काम करतानाचा अनुभव आनंददायी होता. लंडनमधील हवामानाचा अंदाज नसतानाही आम्ही वेळापत्रकानुसार चित्रीकरण पूर्ण करण्यात यशस्वी झालो. या वर्षाच्या अखेरीस 'कैरी' चित्रपट प्रदर्शित करण्याचा आमचा मानस आहे.''
'कैरी'चा काही भाग कोकणातही चित्रीत झाला आहे.