मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा विविध स्तरांवरील कलाकृतींना आणि कलावंतांना गौरविणाऱ्या अर्चना नेवरेकर फाऊंडेशन प्रस्तुत संस्कृती कलादर्पणचा ‘१९ वा संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१९’हा चित्र-नाट्य पुरस्कार सोहळा नुकताच दिमाखात संपन्न झाला. यात ‘दादा एक गुड न्यूज’ आहे या नाटकाने तर ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने बाजी मारली. मालिका विभागात ‘छत्रीवाली’ या मालिकेने सर्वोत्कृष्ट मालिकेचा मान मिळवला.
सोबत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना संस्कृती कलादर्पणच्या सर्वश्रेष्ठ ‘कलागौरव’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. मधुरा देशपांडे आणि सिद्धार्थ चांदेकर या दोघांच्या खुमासदार सूत्रसंचलनाने कार्यक्रमाची रंगत चांगलीच वाढवली. संस्कृती कलादर्पण गौरव सोहळ्याला चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती.
ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचा गौरव करण्यात आला. शाल, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे या पुरस्कारचे स्वरूप आहे या पुरस्काराच्या निमित्ताने आपल्या आजवरच्या प्रवासाला उजाळा देतानाच रोहिणी हट्टंगडी यांनी आपले आई-वडिल, नाट्यक्षेत्रातील गुरु यांच्याविषयीची कृतज्ञता याप्रसंगी व्यक्त केली. राजदत्त यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळणे हे माझ्यासाठी निश्चितच आनंददायी असल्याची भावना रोहिणीजींनी व्यक्त केली.
कलावंतांच्या धमाल परफॉर्मन्समुळे हा सोहळा चांगलाच रंगला. गेली १९ वर्षे मनोरंजन विश्वात कार्यरत असणाऱ्या ‘संस्कृती कलादर्पण’च्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिलेल्या कलावंत, तंत्रज्ञ,प्रसिद्धी माध्यमांचे तसेच प्रेक्षकांचे आभार संस्कृती कलादर्पण संस्थेच्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर आणि संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी व्यक्त केले. हा रंगतदार सोहळा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रविवार २३ जूनला दुपारी १:०० वा. व सायंकाळी ७.०० वा. प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.