सध्या अवघ्या महाराष्ट्राला भेडसावणारा प्रश्न म्हणजे पाणी. नेमक्या या प्रश्नाला हात घालणारा सिनेमा म्हणजे ‘पाणी’. ‘पाणी’ सिनेमाच्या निमित्ताने आदिनाथ कोठारेनेही दिग्दर्शनाच्या कारकिर्दीचा श्रीगणेशा केला आहे. आदिनाथला 19 व्या न्यूयॉर्क इंडियन चित्रपट महोत्सवात ‘पाणी’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता विभागात पुरस्कार प्राप्त झाला आहे.
या महोत्सावात ‘पाणी’ सिनेमाला अभिनय आणि दिग्ददर्शन विभागात नामांकन मिळालं होतं. आदिनाथने नुकत्याच आपल्या सोशल मिडियावर पोस्ट करुन १९ व्या न्यूयॉर्क इंडियन चित्रपट महोत्सवात ‘पाणी’ सिनेमाला ‘बेस्ट अॅक्टर’ आणि ‘बेस्ट दिग्दर्शक’ अशी दोन नामांकनं मिळाली असल्याचं सांगितलं होतं.
त्यापैकी आदिनाथला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या सिनेमाची निर्मिती प्रियांका चोप्राच्या ‘पर्पल पेबल’ या प्रॉडक्शन कंपनीने केली होती. ११ मे रोजी न्यूयॉर्कमधील व्हिलेज ईस्ट इथे या सिनेमाचा प्रिमियर पार पडला. आदिनाथने या पुरस्काराविषयी सोशल मिडियावर भावना व्यक्त केल्या आहेत. तो आपल्या पोस्टमध्ये म्हणतो. ‘ या पुरस्काराने मला खुप सन्मानित झाल्यासारखं वाटत आहे. पण याशिवाय जबाबदारी वाढल्याची जाणीवही आहे. मुळातच या पुरस्कारामुळे वाढदिवसाचा आनंद दुपटीने वाढला आहे. सगळ्यांचे खुप खुप आभार’. आदिनाथचा हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे.