मल्टीप्लेक्समधील मराठी सिनेमांच्या प्रदर्शनावरून अनेकदा वाद झाल्याच्या बातम्या समोर येत असतात. याशिवाय मल्टीप्लेक्समधील पदार्थांच्या दरवाढीबाबतही अनेकदा आंदोलनं होत असतात. पण आता नवीनच प्रकार समोर आला आहे. मनसेच्या चित्रपटसेनेचे नेते अमेय खोपकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.
अमेय यांचा मित्र ठाण्याच्या पीव्हीआर मॉलमध्ये ‘ये रे ये रे पैसा 2’ बघायला गेला होता. त्यावेळी सिनेमा बघणारे 4 जण असल्याने त्यांनी 4 लोकांचं तिकीट मागितलं. पण व्यवस्थापनाने 3 लोकांचं तिकीट दिलं. चूक लक्षात आणून दिल्यावर तिकिटाच्य कस्टमर कॉपीवर पेनाने 4 सीट बूक असल्याचं लिहून दिलं. पण थिएटरकडे तिकीटाचे पैसे चार लोकांचे आणि तिकीट मात्र तीन सीट्सचं असा डाटा जमा झाला. त्यामुळे एका व्यक्तीच्या तिकीटाचे पैसे आपसुकच मल्टीप्लेक्स मालकाच्या खिशात गेले असल्याचं अमेय खोपकर यांचं म्हणणं आहे. मल्टीप्लेक्स चालकांच्या या वागण्याविरोधात तीव्र आंदोलना करणार असल्याचंही अमेय यांनी सांगितलं आहे.