मराठी सिनेमांचा झेंडा अटकेपार रोवला जातोय. आज अनेक मराठी सिनेमांचे संपूर्ण शूटींग परदेशात केलं जात आहे. पण देशांतर्गत शूटींगलाही आजकाल तितकंच प्राधान्य दिलं जात आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना त्यांच्या बलाढ्य संस्कृती आणि परंपरांचा वारसा आहे. आणि दोन्हीमध्ये बऱ्यापैकी साधर्म्यही आहे. कला - साहित्य - संस्कृतीसह निसर्गा रचनेत कमालीचं साम्य आढळून येते. पश्चिम बंगालचं हे वैभव पहाण्याची संधी दिग्दर्शक शोभो बासू नाग आणि निर्माते प्रीतम चौधरी, विकी शर्मा सहयोगी निर्माते त्यांच्या 'फॅटफिश एन्टरटेन्मेन्ट' प्रस्तुत 'अवांछित' या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांना लवकरच देणार आहेत. नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पश्चिम बंगालच्या जुन्या आणि नव्या कोलकाता शहरात सुरु झाले आहे.
वडील-मुलाच्या नात्यावर 'अवांछित'हा सिनेमा बेतल्याचं समजतं. बंगालमध्ये वास्तव्यास असणा-या मराठी कुटुंबियांची ही गोष्ट आहे. कवी सौमित्र उर्फ अभिनेते किशोर कदम, अभय महाजन, मृणाल कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, सुहास जोशी, योगेश सोमण, मृण्मयी गोडबोले यांच्यासह बंगाली अभिनेते बरून चंदा अशा कलाकारांची फौज सिनेमात असणार आहे. सिनेमामध्ये मराठी कलाकारांसह काही बंगाली कलाकारही झळकणार आहेत. मूळचा कोलकाताचा असलेला, पण महाराष्ट्रात वास्तव्यास असणाऱ्या शोभो बासू नाग या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळतोय. त्याचा हा पहिलाच सिनेमा असून यापूर्वी त्यानं जाहिरात, सिनेमांसाठी क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं आहे.
. 'अवांछित' सिनेमाचं कोलकाता येथे महिन्याभरासाठी शूटींग सुरु झालं आहे.