या देवी सर्वभूतेषु, शक्तिरुपेण संस्थिता... नमस्तयै नमस्तयै नमो नम:... या मंगल स्वरांनी श्री महालक्ष्मी मंदिराचा परिसर दुमदुमून गेला. देवीस्वरुप असलेल्या लहान मुलींनी स्तोत्रपठण करीत देवीनामाचा जयघोष केला. आपले पूजन होत असल्याचे दृश्य पाहताना प्रत्येक चिमुकलीच्या चेह-यावरील आनंद काहीसा वेगळा होता.
विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कन्यापूजन करताना मुलींचे पाद्यपूजन, औक्षण करुन त्यांना भेटवस्तू देखील दिल्या. श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग च्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त मंदिरात देवदासिंच्या मुलींच्या कन्यापूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी, मनिषा अर्नाळकर, शुभांगी आफळे, चरणजीत सिंग, माजी नगरसेवक दिलीप उंबरकर, सामजिक कार्यकर्ते पीयुष शाह, संकेत देशपांडे, मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले आदी उपस्थित होते. कन्यापूजनानंतर ट्रस्टतर्फे सर्व मुलींना शैक्षणिक साहित्य, खाऊ व भेटवस्तू देखील देण्यात आल्या.
प्राजक्ता माळी म्हणाल्या, वेदकाळापासून कन्यापूजन हे महापुण्याचे काम मानले जाते. पुढची पिढी ही स्त्रिच्या हातामध्ये आहे. मुलांवर संस्कार घडवून त्यांना समाजात स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम प्रत्येक घरातील स्त्री करीत असते. त्यामुळे हे कन्यापूजन आज देखील सुरु असणे ही चांगली बाब आहे. देवीची अनेक शक्ती रुपे आहेत आणि त्यामुळेच आपण या पृथ्वीवर चांगल्या पद्धतीने जीवन जगत आहोत.
अमिता अग्रवाल म्हणाल्या, शक्ती, बुद्धी आणि धनधान्य देणा-या मातांची रुपे वेगवेगळी आहेत. लहान मुलींंमध्ये ही रुपे दिसतात. कन्या हे देवीचे स्वरुप असते. मात्र, मुलींनी प्रत्येक क्षेत्रात धैर्याने काम करायला हवे. तरच देवी प्रसन्न होईल. कुटुंबात मुलगी होणे, ही गर्वाची बाब आहे, असेही त्यांनी सांगितले.