मराठी माणसांचं आणि सणांचं हे वेगळं नातं आहे. पण अलीकडच्या काळात हे सण साजरा करण्याचे स्वरूप बदलत चाललेले दिसते आहे. धर्म, संस्कार, विधी-परंपरा, नातेसंबध या संज्ञांना तिलांजली देत गोंगाटी सादरीकरणाकडे आणि वारेमाप उधळपट्टी करण्याकडे जनसामान्यांचा कल दिसतोय. सण आणि उत्सवासंबंधीची आजची वास्तविकता यावर अतिशय मार्मिक, परखड तरीही मनोरंजक प्रकाशझोत ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटातून टाकण्यात आला आहे. येत्या ११ ऑक्टोबरला ‘आप्पा आणि बाप्पा’ तुमच्या मनोरंजनासाठी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. ‘सन ऑफ सरदार’ व ‘अतिथी तुम कब जाओंगे’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचा ‘आप्पा आणि बाप्पा’ हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.
सरळमार्गी आयुष्य जगणाऱ्या मध्यमवर्गीय गोविंद कुलकर्णी म्हणजेच आप्पाच्या आयुष्यात अशी घटना घडते, की तो वाजत गाजत घरी आणलेल्या गणपती विरोधातच असहकार पुकारतो. हा असहकार नेमका कशा विरोधात असतो ? हे सगळं पाहण्याचा एक वेगळा अनुभव ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटातून घेता येणार आहे. एखाद्या गोष्टीचा सामना करावा लागतो तेव्हा त्या परिस्थितीचा प्रतिकार करण्यासाठी येणारे दडपण व या दडपणातून त्यांनी घेतलेली भूमिका यावर या चित्रपटाची मध्यवर्ती कथा फिरते. आपल्या आजूबाजूला प्रत्येक मध्यमवर्गीय घरामध्ये दिसणारी ही वास्तविकता मजेशीर पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटातून केला आहे.
साजरीकरणाची अमुक एक मर्यादा गाठल्याशिवाय साजरंपण येत नाही हा समज हल्ली रूढ होऊ लागला आहे. या सगळ्यामुळे एखाद्या चांगल्या गोष्टीचा मूळ उद्देश आपण हरवून बसलो आहोत हे सांगू पाहणारा हा चित्रपट प्रत्येकाचा दृष्टीकोन बदलेल असा विश्वास चित्रपटातील कलाकार व्यक्त करतात. दिलीप प्रभावळकर, भरत जाधव, सुबोध भावे हे जबरदस्त त्रिकुट या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले असून यांच्यासोबत संपदा कुलकर्णी, उमेश जगताप, शिवानी रांगोळे आदि कलाकार या चित्रपटात आहे.
गरीमा प्रोडक्शन्स् ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते ‘गरीमा धीर व जलज धीर आहेत. अश्वनी धीर व अरविंद जगताप यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. छायाचित्रण सूर्या मिश्रा यांचे आहे. संगीताची जबाबदारी सारंग कुलकर्णी, सायली खरे, अभंग रीपोस्ट यांनी सांभाळली आहे. लाईन प्रोड्यूसर अजित सिंग आहेत. ‘पॅनोरमा स्टुडिओज् इंटरनॅशनल’ तर्फे हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
११ ऑक्टोबरला ‘आप्पा आणि बाप्पा’प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.