मराठी सिनेमाला आजवर लाभलेल्या चॉकलेट बॉय इमेज असलेल्या अभिनेत्यांमध्ये सचिन पिळगावकर यांच्यानंतर कुणाचं नाव येत असेल तर स्वप्नील जोशीचं नाव सर्वात आधी येतं. पौराणिक भूमिकांपासून करीअरची सुरुवात करणा-या स्वप्नीलला रामानंद सागर यांच्या मालिकेत युवा कृष्णाची व्यक्तिरेखा साकारायची संधी मिळाली. त्याच्या भूमिकेने रसिकांचं मन जिंकलं.
मराठी सिनेमा ‘मानिनी’ मधून त्याने मराठी सिनेमात पदार्पण केलं आहे. ‘चेकमेट’मधील त्याच्या भूमिकेचं कौतुकही झालं. यानंतर मालिका आणि सिनेमांमधून तो रसिकांच्या भेटीला येऊ लागला. गोड लाघवी चोह-याच्या स्वप्निलने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं.
त्याच्या चॉकलेट लूकची रसिकांना पुन्हा मोहिनी पडली ती ‘मुंबई पुणे मुंबई’ या सिनेमातून. या सिनेमातील त्याच्या भूमिकेच खुप कौतुक झालं. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेत त्याच्या आणि मुक्ता बर्वेच्या केमिस्ट्रीचं कौतुक झालं. या जोडीच्या रोमान्सचा सिलसिला असाच ‘मुंबई पुणे मुंबई 2’ आणि ‘मुंबई पुणे मुंबई ३’ मध्येही सुरु राहिला.
‘दुनियादारी’ या सिनेमातून त्याने साकारलेला श्रेयस भाव खाऊन गेला. त्यानंतर फुगे, मितवा, प्यार वाली लव्हस्टोरी, तु ही रे, वेलकम जिंदगी, लाल इश्क या सिनेमातून त्याने रोमॅंटिक भूमिका साकारल्या आहेत.
स्वप्नीलने भिकारी, रणांगण, मोगरा फुलला या सिनेमात चौकटी बाहेरच्या व्यक्तिरेखाही साकारल्या. मालिका सिनेमा, नाटक या तिन्ही आघाड्यावर सक्षमपणे काम करण्या-या या अभिनेत्याला पीपिंगमून मराठीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा….