टॉल, डार्क अँड हँडसम लूकने आजही तरुणींच्या ह्रदयावर राज्य करणारा समीर धर्माधिकारी पहिल्यांदाच एका विनोदी अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. केवळ विनोदी नाही तर लग्नोत्सुक तरुणाच्या भूमिकेतला संदीप म्हणजेच समीर धर्माधिकारी खऱ्या प्रेमाच्या शोधात दिसणार आहे. अमोल लक्ष्मण कागणे प्रस्तुत लक्ष्मण एकनाथराव कागणे निर्मित आणि शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित 'वाजवुया बँड बाजा' ह्या बहुचर्चित चित्रपटातील आत्तापर्यंत गुलदस्त्यात ठेवलेली कलाकारांची नावं आत्ता हळूहळू बाहेर येणार आहे. त्यातील एक नाव समीर धर्माधिकारी असून दुसरा हुकमी एक्का सुप्रसिद्ध अभिनेते मंगेश देसाई हे आहेत. संदीप प्रमाणे म्हणजेच समीर, अमित म्हणजेच मंगेश देसाई देखील या चित्रपटात लग्नाळू तरुणाच्या भूमिकेत दिसतील. समीर धर्माधिकारी आणि मंगेश देसाई हे दोघेही 'वाजवूया बँड बाजा' या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत हे विशेष.
संदीप आणि अमित या दोन भावांच्या लव्हस्टोरीचा धुमधडाका 'वाजवूया बँड बाजा' चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. समीर धर्माधिकारींनी वठवलेला संदीप एक शिक्षक असून समाजात चांगले विद्यार्थी घडवणं हे आपलं आद्य कार्य मानणाऱ्या संदीपच्या आयुष्यात आई आणि आपल्या बालमैत्रिणीव्यतिरिक्त दुसऱ्या स्त्रियांना प्रवेश नाही. तर मंगेश देसाईंनी साकारलेला अमित हा गावातला एकुलता एक कंपाउंडर कम डॉक्टर असून ज्या डॉक्टरकडे अमित प्रॅक्टिस करतोय त्याच डॉक्टरच्या मुलीच्या प्रेमात घायाळ झाला आहे. संदीप आपल्या बालमैत्रिणीसमोर आपल्या प्रेमाची ग्वाही देतो का? अमितच्या प्रेमाची साक्ष डॉक्टरच्या मुलीला पटते का? पर्यायने संदीप आणि अमित या दोघा भावांचे प्रेम यशस्वी होतेत का? या प्रश्नाची मजेशीर उकल पाहण्याकरिता 'वाजवूया बँड बाजा' पाहायलाच हवा असा आहे.
संदीप नाईक यांनी 'वाजवुया बँड बाजा'ची मजेशीर कथा लिहिली आहे तर पटकथा-संवाद निशांत नाथराम धापसे यांनी लिहिली आहेत. छायाचित्रण नागराज दिवाकर यांचे असणार आहे. संगीत-विजय गटलेवार, गायक-आदर्श शिंदे, संकल-निलेश गावंड आणि कलादिग्दर्शक-संतोष समुद्रे अशी इतर श्रेयनामावली आहे.प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला आपलं प्रेम यशस्वी होणार का ह्या सर्वसामान्य प्रश्नाची धाकधूक असतेच असते. 'वाजवूया बँड बाजा' त्यावर जरा गंमतीशीर पद्धतीने भस्य करतो. हा चित्रपट तरुणांना नक्कीच भावेल अशी निर्माते -दिग्दर्शकांना आशा आहे.