'आईच्या गावात' या गाण्यात 'गर्ल्स' धमाल करताना दिसत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन आयुष्यातून वेळ काढून 'गर्ल्स' स्वतःसाठी जीवन जगत आहेत. अशा स्वछंदी आयुष्याचा आनंद घेताना केली जाणारी मजा या गाण्यातून दिसत आहे. मुलांसारखेच किंबहुना मुलांनाही हेवा वाटेल असे आयुष्य ह्या 'गर्ल्स' जगत आहे.
'आईच्या गावात' हे गाणे प्रफुल आणि स्वप्निल यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गाणं प्रफुल, स्वप्निल यांनी तब्बल तेरा वेळेस संगीतबद्ध केले. गाणं पूर्ण झाले की, गाण्यात काहीतरी अपूर्ण असल्याची भावना सगळ्यांना जाणवायची. पुन्हा नव्याने गाणे संगीतबद्ध केले जायचे असे तेरा वेळा झाले. अखेर चौदाव्या वेळेस सर्वांना अपेक्षित गाणे मिळाले. या संपूर्ण प्रक्रियेत प्रफुल, स्वप्निल यांनी त्यांची जिद्द कायम ठेवत एकच गाणे चौदा वेळा संगीतबद्ध केले. या गाण्याच्या अनुभवाबद्दल प्रफुल आणि स्वप्निल सांगतात, "हे गाणं जेव्हा जेव्हा तयार झाले तेव्हा मनात काहीतरी राहतंय, अशी भावना येत होती. सरतेशेवटी आमच्या चौदाव्या प्रयत्नातून आम्हाला आमचे हवे असलेले गाणे मिळाले. या गाण्याला तयार करण्यासाठी बरेच दिवस लागले मात्र आम्ही दोघांनी आमची जिद्द आणि आमचे प्रयत्न सोडले नाहीत. मागच्या गाण्यात आपण कुठे कमी पडलो याचा विचार करून नवीन गाणे करत गेलो आणि गाणे तयार केले."
गाण्याच्या शब्दांना अनुसरून संगीतकारांनी गाण्याला उत्तम संगीत देत, गाण्याला अपेक्षित अशी ऊर्जा दिली. हे गाणे नक्कीच थिरकायला लावेल.'आईच्या गावात' या मंदार चोळकर यांच्या हटके शब्दांना प्रफुल आणि स्वप्निल यांनी संगीतबद्ध केले असून वैशाली सामंत, कविता राम आणि मुग्धा कऱ्हाडे यांनी स्वरबद्ध केले आहे. या उडत्या चालीच्या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन सुजित कुमार यांनी केले असून विशाल सखाराम देवरुखकर दिग्दर्शित 'गर्ल्स' हा सिनेमा २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. 'एव्हरेस्ट एंटरटेनमेंट', 'कायरा कुमार क्रिएशन्स' प्रस्तुत आणि 'अ कायरा कुमार क्रिएशन्स प्रॉडक्शन'च्या अंतर्गत 'गर्ल्स' या चित्रपटाची निर्मिती नरेन कुमार यांनी केली आहे. तर चित्रपटाचे लेखन हृषिकेश कोळी यांनी केले असून अमित भानुशाली यांनी सहाय्यक निर्माता म्हणून काम पाहिले आहे.