By  
on  

मराठी मालिकांमधील या खलपात्रांचा अंदाज आहे खास

कोणत्याही मालिकेला नायक-नायिका जितकी प्रसिद्धी मिळवून देतात. तितकेच खलपात्रही मालिकेला वेगळा टच देतात. सध्या अनेक मालिकांमधील खलपात्र प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवत आहेत.
 या पात्रांचा बोलण्याचा अंदाज, पेहराव, स्टाईल सगळंच हटके आहे. या पात्रांची संवाद फेकीची स्टाईल प्रेक्षकांच्या ओठांवर रुळली आहे.

मालिका गाजावण-या या खलनायकांच्या यादीत पहिला क्रमांक आहे तो आण्णा नाईकांचा... ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील आण्णा नाईक या पात्राने रसिकांच्या मनात स्थान मिळवलं आहेच शिवाय खलनायकी दराराही उत्तम साकारला आहे. धोतर आणि शर्ट घातणा-या आण्णा नाईकांच्या नजरेची जरबच समोरच्याला धडकी भरवण्यास पुरेशी ठरते.   

यानंतर क्रमांक येतो सौंदर्या इनामदारचा. क्लासी लूक असलेल्या सौंदर्याचा दरारा ही तितकाच आहे. यापुर्वीच्या एका मालिकेत ‘कळलं?’ असं ठसक्यात विचारणा-या हर्षदा खानविलकर या भूमिकेला न्याय देत आहेत.

‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेतील खलनायिका शनाया मात्र आधुनिक खलनायिका आहे. ती स्टायलिश आहेच. याशिवाय राधिकाला छळण्यासाठीचे तिचे हातकंडेही धमाल आहेत. शनायासारखीच स्टायलिश आहे ‘सुखाच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेतील ‘सानवी’. अनूला त्रास देण्यासाठी संधी शोधत असलेली सानवी अनेकदा तोंडघशी पडतानाही दिसते. 

खलपात्रांच्या यादीतील आणखी एक वजनदार नाव म्हणजे आत्याबाईंचं. ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेत चिन्मयी सुमीत साकारत असलेली आत्याबाईंच्या स्टाईल आणि अभिनयाचे अनेक फॅन आहेत. व्यक्तिरेखेला गावरान टच असलेल्या आत्याबाई अनेकांना आवडून जातात. 

मूळ खलनायकी बाज नसलेली तरीही काहीशी ग्रे शेड असलेली गोपिकाबाईंची भूमिका ‘स्वामिनी’मालिकेत भाव खाऊन जात आहे. पारंपरिक साज-लेण्यामध्ये सुंदर दिसत असलेल्या गोपिका बाईंचा करारी तिखट अंदाज ऐश्वर्या नारकर यांनी पुरेपूर रंगवला आहे. मालिकेतील खलपात्रांच्या नावाने प्रेक्षक कितीही बोटं मोडत असले तरी या पात्रांशिवाय नायकाचं ठळकपण उठून दिसत नाही. हे ही तितकंच खरं......!

 

 

Recommended

PeepingMoon Exclusive