प्रसिद्ध ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची निवड शतकमहोत्सवी अखिल मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी करण्यात आल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी जाहीर केली. अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या रविवारी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचंसुध्दा त्यांनी स्पष्ट केलं आहे.
‘परिषदेच्या घटनेतील कलमाप्रमाणेच कार्यकारिणीने एकमताने डॉ. जब्बार पटेल यांच्या नावाची शिफारस नियामक मंडळाला केली होती. ते नाव आज नियामक मंडळाच्या बैठकीत घोषित करण्यात आले व त्यावरच शिक्कामोर्तब झाल्याचे, प्रसाद कांबळी यांनी स्पष्ट केले.
डॉ. पटेल यांनी आजवर अनेक नाटके आणि चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून यामध्ये 'जैत रे जैत', 'मुक्ता', 'सामना', 'सिंहासन,' 'एक होता विदूषक' यांसारख्या दर्जेदार सुपरहिट सिनेमांचा समावेश आहे. त्याचबरोबर राज्य शासनाची निर्मिती असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केला. प्रायोगिक नाट्य चळवळीसाठी त्यांनी थिएटर अकादमी ही संस्थाही स्थापन केली आहे. मराठी रंगभूमी आणि सिनेविश्वात डॉ. जब्बार पटेल यांचं मोठं योगदान आहे.