'अग्निहोत्र 2'ला अल्प प्रतिसाद, लवकरच गुंडाळणार गाशा?

By  
on  

मोठा गाजावाजा करत 'अग्निहोत्र 2'ही मालिका तब्बल 10 वर्षानंतर नव्या रुपात आणि नव्या रहस्यांसह रसिकांच्या भेटीला आली खरी, पण आता प्रेक्षकांच्या मनात व टीआरपीच्या स्पर्धेत ती  तग धरु शकत नाहीय, अशी चर्चा आहे. 'अग्निहोत्र'च्या पहिल्या पर्वावर रसिकांनी भरभरुन प्रेम केलं. आठ गणपतींचं रहस्य व अग्निहोत्री कुटुंब ह्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. पण दुसरं पर्व येणार म्हणून सारेच उत्सुक होते. पहिल्या पर्वाप्रमाणे हे पर्वसुध्दा गाजेल अशी निर्माता-दिग्दर्शकांना आशा होती. आता ती सपशेल फोल ठरतेय असंच दिसतंय, कारण टीआरपीच्या आकड्यांत ती बसत नाहीय. 

'अग्निहोत्र'च्या पहिल्या पर्वाचं दिग्दर्शन सतिश राजवाडे यांनी केलं होतं, तर दुस-या पर्वाचं दिग्दर्शन भीमराव मुडे करतायत व कथा श्रीरंग गोडबोले यांची आहे. नव्या पिढीची नवी गोष्ट आणि जुन्या नव्या कलाकारांचा मेळ, उत्तम सेट अशी तगडी टीम असूनही ही मालिका रसिकांचं मन जिंकण्यात कमी पडली व तिथूनच टीआरपीचं गणित जुळेनासं झालं, त्यामुळेच आता हे दुसरं पर्व लवकरच रसिकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात आहे. 

प्रेक्षकांच्या अपेक्षा पहिल्या पर्वाच्या तुलनेत या दुस-या पर्वात कुठेतरी पूर्ण न झाल्याने हा निर्णय घेतला जात असेलही, पण कुठेतरी प्रेक्षकांचा हिरमोडसुध्दा होतोय. मालिका आता कुठल्या वळणावर  निरोप घेणार हे पाहणंसुध्दा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Recommended

Loading...
Share