दिग्दर्शक सुजय डहाकेच्या एका वक्तव्याने मराठी मनोरंजन विश्वात बरीच खळबळ माजली आहे. सुजयने त्याचा सिनेमा 'केसरी'च्या प्रोमोशन दरम्यानच्या मुलाखतीत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यावर अनेक प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. मराठी मालिकांमध्ये फक्त ब्राम्हण अभिनेत्रीच पाहायला मिळतात व इंडस्ट्रीत जातीपातीचं राजकारण सुरु असतं असं वक्तव्य केलं होतं. सुजयच्या या वक्तव्यावर आता मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय व आघाडीची अभिनेत्री तेजश्री प्रधानने सडेतोड उत्तर दिलं आहे.
तेजश्रीने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तेजश्री आपल्या पोस्टमध्ये म्हणते, "मी ब्राम्हण नाहीए बरं ! CKP आहे..पण काम आहे माझ्याकडे. आणि गेली 'य' वर्षं !!याला Talent म्हणूया का? " . एकंदरच तेजश्रीने या जातीपातीच्या वक्तव्यावर टॅलेण्टचं उदाहरण देत जबरदस्त उत्तर दिलं आहे. तेजश्रीच्या या पोस्टवर अनेक संमिश्र प्रतिक्रिया नेटक-यांनी दिल्या आहेत. कोणी म्हणतंय , 'कलाकार हा जातीवंत कलाकार असतो, त्याला जातीच्या चष्म्यातून पाहू' नये. तर कोणी म्हणतंय 'कलेला तरी जातिवादातून मुक्त केले पाहिजे'.
प्रसिद्ध मराठी मालिकांमध्ये मुख्य भूमिकेत ब्राम्हण मुलींनाच घेतलं जातं, इतर जातीय मुलींना मुख्य भूमिकांसाठी कामं मिळत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली होती. दरम्यान 'केसरी'च्या प्रोमोशन दरम्यान घडलेल्या या संपूर्ण मुलाखतीवर या सिनेमात भूमिका साकारणारे अभिनेते जयवंत वाडकर यांनीसुध्दा आपली बाजू स्पष्ट केली आहे.
एकंदरच या प्रकरणावर आणखी किती आणि कशा प्रतिक्रिया उमटणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.