करोनामुळे जगभर नुसती उलथापालथ सुरुय. दैनंदिन व्यवहार कोलमडले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होतेय. खबरदारीचा उपाय म्हणून गर्दी टाळण्यासाठी सरकारनं जमावबंदी लागू केली आहे. शाळा, कॉलेजांना सक्तीची सुट्टी देण्यात आली आहे तर सिनेमा, नाट्यगृह आणि त्यांची चित्रिकरणंही बंद केली आहेत, तसंच कार्यालयीन कर्मचा-यांना काही दिवस वर्क फ्रॉम होमची सुविधा द्यावी असंही सरकारने आवाहन केलं आहे. तेव्हा आता प्रत्येक जण घरात आहे व ही अनामिक सुट्टी घालवतोय.
रोजच्या रोज दहा-बारा तास शूटिंग करणाऱ्या डेली सोपमधल्या कलाकारांना करोनाच्यानिमित्तानं सक्तीची सुट्टी मिळाली आहे .त्यामुळं सर्व कलाकार मंडळी घरी बसून आराम करत आहेत. सोशल मीडियावर स्टोरीज शेअर करत आहेत.
मराठी सिनेसृष्टीतली अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्र दौ-यावर आहे. तिचा एक ट्रॅव्हल शो लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. यानिमित्त ती महाराष्ट्र दौरा करत होती आणि तिथले हिंडता-फिरतानाचे अनेक फोटो पोस्ट करत होती, पण करोनाच्या धास्तीने तिच्या शोचं चित्रिकरणही थांबवलं आहे. म्हणूनच ती सुध्दा घरी विश्रांती घेतेय.
प्राजक्ता पोस्टमध्ये म्हणते,आपल्या सर्वांनाच.....कुटुंबाला वेळ देण्याची, स्वत:ला वेळ देण्याची, आत्मपरीक्षण करण्याची, Health on priority ठेवण्याची. म्हणून मिळालीये सुट्टी. ती सत्कारणी लावूया. सकस आणि ताजं खा (शक्यतो शाकाहार), व्यायाम करा, ध्यान करा... असं म्हणच प्राजक्ताने कुटुंबाला व स्वत:च्या आरोग्याला प्राधान्य देण्याची विनंती केली आहे.