नुकतीच प्रदर्शित झालेली ‘समांतर’ ही वेब सिरीज सध्या लक्षवेधी ठरतेय. मात्र या वेब सिरीजमध्ये तुम्हाला असं काही पाहायला मिळतय जे याआधी कधीच पाहिलं नव्हत. 1988 मध्ये आलेल्या ‘महाभारत’ या मालिकेतील कृष्णाच्या भूमिकेतील नितीश भारद्वाज यांनी सगळ्यांची मनं जिंकली होती. त्यांनी साकारलेला कृष्ण, पेहराव, त्यांचा आवाज लोकांना भावला. टेलिव्हिजन विश्वात अजरामर ठरलेल्या महाभारत या मालिकेतील त्यांची ही भूमिकाही आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे.
त्यानंतर 1993 मध्ये अभिनेता स्वप्निल जोशीने ‘कृष्णा’ या मालिकेत साकारलेल्या कृष्णाला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळाली. कृष्णाची भूमिका साकारलेल्या या दोन्ही कलाकारांची पुढे कृष्ण अशीच ओळख झाली. त्यानंतरही हे कलाकार जिथे जिथे दिसले तिथे कृष्णाची भूमिका साकारलेले कलाकार अशी त्यांना ओळख आजही मिळते.
मात्र नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वेब सिरीजमध्ये हेच दोन कलाकार चक्क समोरा समोर आलेले दिसले. एकिकडे पौराणिक मालिकांसाठी प्रसिद्ध असलेले नितीश भारद्वाज तर दुसरीकडे मराठीतला रोमँटिक भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला स्वप्निल जोशी, हे दोन कलाकार या वेब सिरीजच्या निमित्ताने एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाले.
या वेब सिरीजमध्ये नितीश भारद्वाज यांची महत्त्वाची भूमिका असून त्यांची कमाल एन्ट्री या सिरीजमध्ये दाखवली आहे. या वेब सिरीजमधील दोघांचा एकत्र सीन पाहून टेलिव्हिजन विश्वातील हे दोन्ही प्रसिद्ध कृष्ण समोरा समोर आलेल्याचं पाहायला मिळतयं. नितीश भारद्वाज यांचा आवाज, अभिनयकौशल्य याने त्यांचा सीन खुललाय. तर स्वप्निल जोशी या सिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारत असून कुमार महाजन असं त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.
मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित झालेल्या या वेब सिरीजला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे.