एकीकडे कोरोना व्हायरसचा सुळसुळाट सुरु आहे तर दुसरीकडे यापासून बचाव करण्यासाठी कलाकार मंडळी घरी राहणचं पसंत करत आहेत. काही कलाकार घरात बसून आपला छंद जोपासत आहेत तर काहींना या निमित्ताने आपल्या परिवारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली आहे.
अभिनेत्री सोनाली खरेनेही सध्या घरात राहून परिवारासोबत वेळ घालवणं पसंत केलं आहे. या वेळेचा सदुपयोग करण्याचं सोनालीने ठरवले आहे. याविषयी पिपींगमून मराठीला दिलेल्या माहितीत ती सांगते की, “खुपसाऱ्या गोष्टी ज्या मी आधी परिवारासोबत राहून केल्या नसतील त्या करायचा प्रयत्न करतेय. घरात परिवारासोबत विविध खेळ आम्ही खेळतोय. मला कुकींगची आवड आहे ती मी जोपासतेय.”
सोनालीला एक गोंडस मुलगी देखील आहे. तेव्हा तिच्यासोबत हा वेळ ती कसा घालवतेय हेही तिने सांगीतलं. सोनाली म्हणते की, “माझ्या मुलीला पेंटींगची आवड आहे. पण मला फार पेंटींग येत नाही, त्यामुळे तिच्याकडून मी ते शिकायचा प्रयत्न करतेय. बऱ्याच गोष्टी ज्या आपल्याला धकाधकीच्या आयुष्यात दिसल्या नाहीत, त्या अचानाक दिसू लागल्या आहेत. त्या करायचा प्रयत्न करुयात. आणि कुठेतरी आपलं मानसिक संतुलन छान ठेवायचा प्रयत्न करुयात. बाहेर जे नकारात्मक सुरु आहे त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये यासाठी छान पद्धतिने आपण त्याला सामोरं जाऊयात.” असं म्हणत सोनालीने यातून सकारात्मक दृष्टिकोनाची भावना व्यक्त केली आहे.