अभिनेता सिध्दार्थ जाधवने नुकतच त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवरुन लाईव्ह गप्पा मारल्या. मात्र लाईव्ह येण्याचं सिद्धार्थचं एक महत्त्वाचं कारण होतं. सध्याची कोरोनाची भयावह परिस्थिती लोकं गांभिर्याने घेत नसल्याने सिध्दार्थने त्याच्या लाईव्ह व्हिडीओमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे मांडून सगळ्यांना कळकळीची विनंती केली आहे.
सिध्दार्थ जाधवने नुकताच फेसबूकवर सध्या व्हायरल होत असलेला इटलीतील राहुल वाघचा व्हिडीओ पाहिला. तेथील भयानक परिस्थिती पाहून ही परिस्थिती भारतात किंवा महाराष्ट्रात येऊ नये यासाठी सिध्दार्थने लाईव्ह व्हिडीओच्या माध्यमातून सगळ्यांना घरातच राहण्याचं आवाहन केलेलं आहे. सिध्दार्थ म्हणतो की, “कोरोना काय आहे त्याची दहशत काय आहे हे तुम्हाला कळलय ते इतरांनाही कळवा. इटलीतील राहुल वाघची पोस्ट पाहून मी भावूक झालो होतो तो एका बंदिस्त खोलीत होता आणि तो कळकळीने सांगतोय. तुम्ही ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा”
सिद्धार्थ पुढे म्हणतो की, "शिवाय आपला जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलिस, डॉक्टर, नर्स हे जी लोकं आपल्यासाठी झटतायत. त्यांचा विचार करा. राहुल वाघचा व्हिडीओ पाहून लक्षात आलं की सुरुवातील त्यांच्याकडेही हसण्यावर नेलं होतं. चायनाचेही काही व्हिडीओ पाहिलेत मी. पण आपण आपला भार ड़ॉक्टर आणि पोलिसांवर किती वेळ टाकणार? तुम्हाला घरी बसायला सांगीतलं तरी तुम्ही बाहेर का फिरताय ? देशाच्या बाहेर काय चाललय याची खबरदारी घ्या कारण हा गांभिर्याचा मुद्दा आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा वाढतोय. सध्या काय करायला पाहिजे हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, लोकांना याचं गांभिर्य कळू द्या. याची जाणीव करुन द्या. तुम्ही गर्दीत मिसळू नका जर कुणी असतील तर त्या मुर्ख लोकांनाही शहाणं बनवा.जगभरात राज्यात सगळीकडे बंदी असतानाही तुम्ही का बाहेर पडता. जे काही सुरु आहे त्याचं खूप दु:ख वाटतय. लोकं अजूनही या गोष्टीला गांभिर्याने न घेता घराबाहेर पडत आहेत."
नुकताच मराठी कलासृष्टीतील कलाकारांचाही आवाहन करणारा व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. याआधी हिंदी कलाकारांचा व्हिडीओ प्रदर्शित झाला होता. या मुद्द्यावरुनही सोशल मिडीयावर ट्रोलिंग झालं. यावर सिध्दार्थने योग्य उत्तर दिलय. सिध्दार्थ म्हणतो की, “हा हिंदी आणि मराठी वाद नसून महाराष्ट्र राज्यावर आलेलं देशावर आलेलं मोठं संकट आहे.”
सध्या अशा आवाहनाची आपल्या देशाला, राज्याला प्रचंड गरज आहे. यातून कोरोना व्हायरस या भयानक आजाराविषयीची जागरुकता आणि त्याचं गांभिर्य लोकांपर्यंत पोहोचणं हीच सध्याची गरज आहे.