सध्या करोनाशी दोन हात करायला आपली सरकारी यंत्रणा युध्दपातळीवर काम करतेय. सुजाण नागरिक म्हणून सरकारच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करणं ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. महाराष्ट्र सरकार ज्याप्रमाणे या संकंटाशी लढतंय त्याचं सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळतंय. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या कामाची विशेष प्रशंसा पाहायला मिळतेय. तुम्हालाही हा अनुभव सोशल मिडीयावरुन गेल्या काही दिवसात आला असेल.
इतरांप्रमाणेच अभिनेते किरण माने यांनी सुरुवातीला मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे विराजमान झाल्यावर त्यांच्यावर बरीच टीका केली होती, परंतु आत्ता त्यांच्या या आपत्तीकालीन काळातील कार्य पाहून किरण यांनी फेसबुक पोस्टच्या साह्याने त्यांची माफी मागितलीय.
काय आहे अभिनेते किरण मानेंची पोस्ट
साॅरी उद्धवजी.. मी किरण माने. मला तुमची माफी मागायचीय.
तुम्ही पूर्वीच्या सरकारमध्ये असताना तुमची हतबलता पाहुन खूप टीका केली होती तुमच्यावर ! कणा नसलेला नेता.. ताटाखालचं मांजर म्हणायचो... भाजपासोबत झालेली तुमची फरपट पाहून 'शिवसेनेचा कणखरपणा बाळासाहेबांबरोबर गेला' असं मला वाटायचं.
आज तुम्ही मला खोटं ठरवलंत.
खूप कमी माणसं अशी असतात, जी तुम्हाला चकीत करून टाकतात ! आधी तुमच्या मनात इमेज डागाळलेली असते... अशा काही घटना घडतात की तोच माणूस विजेसारखा लखलखून तुमचे डोळे दिपवून टाकतो !
ऊद्धवजी तुम्ही आज आम्हाला दिपवून टाकताय. आज अत्यंत कठीण परीस्थितीत संपूर्ण महाराष्ट्राला दिलासा देणारं एकमेव कोण असेल तर ते तुम्ही आहात.
खालच्या पट्टीत अत्यंत शांत संयमी बोलणं.. मुद्देसूद-थेट बोलणं..सद्यपरीस्थितीबद्दल सतत 'फॅक्च्यूअल डेटा' देणं.. बोलताना 'अनावश्यक पाल्हाळ' आणि 'डायलाॅगबाजी' टाळणं... खरंच चकीत होतोय रोज !
'लाॅकडाऊन'चा निर्णय खूप आधी आणि योग्य वेळेत घेतला होतात तुम्ही... तो ही थेट प्रशासनामार्फत नोटीस देऊन. लगोलग. 'टीझर-प्रोमो-अॅड-मार्केटिंग आणि मग पिच्चर' अशा फिल्मी गोष्टींत तुम्ही वेळ घालवत बसत नाही. खटक्यावर बोट जागेवर पलटी.. मानलं तुम्हाला !
कालच 'मास्क'स् चा खूप मोठा, जवळजवळ दोन कोटी रूपये किमतीचा बेकायदा साठा पोलीसांनी पकडणं - विनाकारण बाहेर फिरणार्यांना दंडुक्याचा प्रसाद देऊन घरी पाठवणं - माझं घर सातार्यात अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी आहे. शांत एरीया. तिथपर्यन्तसुद्धा रोज रात्रंदिवस पोलीसांनी गस्त घालणं.. इतकी 'एफिशियन्सी' आम्ही आयुष्यात पहिल्यांदा अनुभवतोय. संपूर्ण प्रशासन हललंय. खूप आधार वाटतोय.
कठीण काळात तुमच्यासारखं अत्यंत प्रगल्भ नेतृत्त्व लाभणं हे महाराष्ट्राचं भाग्य आहे ! या काळातलं तुमचं काम सुवर्णाक्षरांनी लिहीलं जाणार आहे. पुढच्या पिढ्या तुम्हाला सलाम करणारेत !!!
धन्यवाद उद्धव बाळासाहेब ठाकरे...मन:पूर्वक धन्यवाद !
- किरण माने.