करोनाचा संसर्गाशी दोन हात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून युध्द पातळीवर प्रयत्न होत असताना लागण झालेल्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. सध्या देशातील करोनाग्रस्तांचा आकडा १,२५१ वर पोहोचला आहे, तर ३२ जणांचा करोनाचा संसर्ग झाल्यानं मृत्यू झाला आहे. दुसरीकडं २१ दिवसांच्या लॉकडाउनमुळे जनजीवन ठप्प झालं आहे. उद्योगांसह सेवा क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. करोना आणि लॉकडाउनमुळे महाराष्ट्र आर्थिक कोंडीत सापडला आहे.
पण या संकटकाळी करोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक उद्योगपती मान्यवर व सेलिब्रिटींनी सढळ हस्ते मदतीचा हात पुढे केला आहे. बॉलिवूड कलाकारांपाठोपाठ आपले मराठी सेलिब्रिटीसुध्दा करोना संकटातून राज्याला सावरायला पुढे सरसावले आहेत. सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी यांच्यानंतर आता अमृता खानविलकर हिनेसुध्दा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी खारीचा वाटा उचलला आहे.
अमृतानेच आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी काही रक्कम योगदान म्हणून दिल्याची पोस्ट फोटोसह शेयर केली आहे.
सर्व बाजूंनी करोनाग्रस्तांच्या मदतीचा ओघ सुरु आहे, देशावरचं हे अस्मानी संकट लवकरच टळो, ही ईश्वरचरणी प्रार्थना करुयात.